का म्हणाले राज ठाकरे ? : या वाहनांना टोल नाही तर आम्ही निर्णय घेऊ
-मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुनावले
प्रतिनिधी
मुंबई : प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रविवारी म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत कडाडून हल्ला चढवला. फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशाराच राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला.
राज ठाकरे यांनी आज आपले निवासस्थान शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज्यातील टोलवसुलीवर अनेक राजकारण्यांचे उदरनिर्वाह होत आहे. अनेकांना या टोलवसुलीतून दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला पैसे मिळतात. त्यामुळे हे नेते कधीही चांगले रस्ते होऊ देणार नाही. प्रत्येक टोलनाक्यावरुन किती टोलवसुली होत आहे? कधीपर्यंत टोलवसुली केली जाणार आहे? याचा हिशेब झालाच पाहीजे, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत तब्बल सात व्हिडिओ दाखवत देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे या सर्वांवरच हल्ला चढवला. निवडणुकीपूर्वी या सर्व नेत्यांनी आपल्या प्रचार सभेत आपण टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर यातील प्रत्येक नेता सत्तेत आला. मात्र, कुणीही टोल बंद केले नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. राज ठाकरेंनी यावेळी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे प्रचारसभेचे व्हिडिओ दाखवले. यामध्ये हे सर्व नेते टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देताना दिसत आहे.
ठाण्यातील टोलदरवाढीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात चार दिवस उपोषण केले. राज ठाकरे यांनी काल त्यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले. यावेळीदेखील राज ठाकरे यांनी टोलवसुलीवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यात दुचाकी, तीनचाकी व प्रवाशांच्या खासगी चारचाकीवर टोल आकारला जात नाही. केवळ व्यावसायिक वाहनांवर टोल आकारला जातो. फडणवीसांच्या या वक्तव्याचा राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला.
पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, तुम्ही तुमच्या वाहनांनी येथे आला आहात. तुम्ही टोल दिला की नाही? राज्यात चारचाकी वाहनांवर सर्रास टोलवसूल केला जातो की नाही? त्यावर पत्रकारांनी हो म्हणताच राज ठाकरे म्हणाले, याचा अर्थ काल फडणवीस जे बोलले ते धांदात खोटे होते. ते इतके थापा मारता हे अनाकलनीय आहे. मला तर लोकांचा प्रश्न पडला आहे. ते एवढे खोटे ऐकून कसे घेतात. म्हणूनच मी म्हणतो टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले, फडणवीसांच्या म्हणण्यानुसार दुचाकी, तीनचाकी व खासगी चारचाकी वाहनांकडून टोलवसूल केला नाही ना, याची खातरजमा आता आम्हीच करणार आहोत. आमची माणसे प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील व या वाहनांना टोल भरू दिला जाणार नाही. यावेळी आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाका आम्ही जाळून टाकू. पुढे सरकारला काय करायचे ते करा.


