कोण आहे त्या ? महाराष्ट्रकन्या बनली स्वीडनची खासदार

कोण आहे त्या ? महाराष्ट्रकन्या बनली स्वीडनची खासदार

-स्टॉकहोम शहरातून मिळविला विजय

प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या नीला विखे पाटील या स्वीडनमध्ये खासदार बनल्या आहेत. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून ४१ वर्षीय नीला विखे पाटील यांनी विजय मिळवला.

नीला विखे पाटील या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.

विजयानंतर ‘स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत सहभागी होताना आनंद होत आहे. स्टॉकहोम शहर आणि देशासाठी योगदान देण्यास आपण उत्सुक आहे’, अशी भावना नीला यांनी व्यक्त केली.

“मला माझ्या आजोबांना अभिमान वाटेल असे काम करायचे आहे. मी १५ वर्षांची असताना त्यांनी मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता,” अशी आठवणही त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितली.

नीला यांनी स्वीडनच्या राजकारणात अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी अर्थ, कर आणि गृहनिर्माण विषयक विषय हाताळले.

स्टॉकहोम सिटी कौन्सिलवर नीला विखे पाटील यांची निवड झाली आणि त्यांनी शहरातील ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीत काम केले.

त्यांनी सांभाळलेल्या इतर जबाबदाऱ्यांमध्ये स्वीडिश यंग ग्रीन्स, ग्रीन पार्टी गोटेन्बर्ग आणि ग्रीन स्टुडंट्स ऑफ स्वीडनमधील पदांचा समावेश आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या स्टॉकहोम युनिटच्या कार्यकारिणीची सदस्य म्हणून काम केले आहे.

नीला विखे पाटील यांचे शिक्षण
नीला यांनी गोटेन्बर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी आणि एमबीए पूर्ण केले आहे. अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षणही नीला विखे पाटील यांनी घेतले आहे. तसेच माद्रिदच्या कॉम्प्ल्युटेन्स विद्यापीठातही त्या शिकल्या आहेत.

संसद सदस्य म्हणून, मुलांचे कल्याण आणि पर्यावरण यावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची योजना आहे. “ज्यांना मतदान करता येत नाही त्यांचा आवाज बनण्याची आणि शहर व देशासाठी योगदान देण्याची माझी इच्छा आहे,” असे नीला विखे पाटील म्हणाल्या.