या राज्यात वाढली भाजपाची चिंता : आव्हानांनी नाकीनऊ

या राज्यात वाढली भाजपाची चिंता : आव्हानांनी नाकीनऊ

-नामांतरण, रंगाचा नवा वाद

प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्तास्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. मात्र, सुरुवातीच्या काळात अत्यंत कठोर निर्णय घेणाऱ्या भाजपा सरकारला राज्यात आता अनेक मोठमोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. केवळ विरोधकांचे आव्हानच नव्हे तर पक्षांतर्गत मतभेदामुळेही भाजपाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

यातील ताज्या वादाला जादवपूर विद्यापीठातील घटनेची पार्श्वभूमी आहे. आठवडाभरापूर्वी या विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांशी संघर्ष झाला. या घटनेनंतर जादवपूरच्या भाजपा आमदार शर्वरी मुखर्जी यांनी विद्यापीठाचे नाव बदलून ‘श्री अरविंद विद्यापीठ’ असे करण्याची मागणी केली.

-नामांतरावरून कोंडी
श्री अरविंदो यांचे या संस्थेशी असलेले नाते आणि संस्थापक सदस्य म्हणून असलेली त्यांची भूमिका लक्षात घेऊन हे नाव देण्यात यावे, असा युक्तिवाद शर्वरी मुखर्जी केला. विशेष बाब म्हणजे, सध्या भाजपा सरकार राज्यातील संस्था किंवा सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासारख्या मुद्द्यांपेक्षा विकास आण सुशासन हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्याच आमदाराने केलेल्या या मागणीमुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच अलीकडेच भाजपाचे कथित समर्थक असलेल्या काही व्यक्तींनी कोलकात्यातील एका प्रमुख दैनिकाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी कार्यालयाच्या पांढऱ्या रंगाच्या इमारतीच्या काही भाग भगव्या रंगाने रंगवून टाकण्यात आला. या घटनेमुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला असून सरकारवर चौफेर टीका होत आहे.

कोलकात्यातील वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर झालेल्या तोडफोडीच्या घटनेपासून भाजपा आणि राज्य सरकारने स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी या घटनेचा पक्षाशी किंवा सरकारशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना भट्टाचार्य म्हणाले की, मी एका विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहे. बंगालमधील जनतेने बदलासाठी मतदान केले आहे. कोणत्याही विशिष्ट जागेचा रंग बदलणे हे या सरकारचे ध्येय नाही. अलीकडच्या काळात राज्यात काही वाद निर्माण झाले असून काहींनी वृत्तपत्राच्या कार्यालयाचा रंग बदलला, मात्र आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नसून हा पक्षाचा किंवा सरकारचा अजेंडा नाही. राज्याचा विकास करणे हेच आमचे खरे ध्येय आहे आणि त्यासाठी सरकार सर्वतोपरी काम करण्यास तयार आहे.

पुढे भूमिका आणखी स्पष्ट करत भट्टाचार्य म्हणाले की, वृत्तपत्र कार्यालयाचा रंग बदलणारे लोक भाजपाचे कार्यकर्ते नाहीत. या संपूर्ण प्रकरणाशी आमच्या पक्षाचा कोणताही संबंध नाही. याशिवाय जादवपूर विद्यापीठाचे नाव बदलण्याबाबत भाजपा आमदार शारबरी मुखर्जी यांनी केलेली मागणीही भट्टाचार्य यांनी फेटाळून लावली. हा आमच्या पक्षाचा अजेंडा नाही. आमदारांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाचा राज्यात अत्यंत झपाट्याने विस्तार झाला. त्यानंतरच्या काही दिवसांतच पक्षांतर्गत शिस्त आणि कारभाराबाबत संघ परिवारातील काही नेत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यातच निर्माण झालेल्या ताज्या वादापासून भाजपा स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

आरएसएसच्या साप्ताहिकातून भाजपाला इशारा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित बंगाली साप्ताहिक स्वस्तिकाने आपल्या ताज्या लेखातून भाजपाला सावधानतेचा इशारा दिला आहे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात प्रवेश करत असल्याचा उल्लेख करताना साप्ताहिकाने पक्षाच्या वाढत्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त केली आहे. भाजपासमोरील सर्वात मोठे आव्हान आता केवळ राजकीय विरोधकांना पराभूत करणे राहिलेले नाही, तर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. भाजपाशी थेट लढू शकेल असा कोणताही विरोधी पक्ष सध्या मैदानात शिल्लक नाही… खरी कसोटी आणि दबाव हा जनतेच्या अपेक्षांना सामोरे जाण्याचा आहे, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे. बंगालच्या मतदारांनी ज्या राजकीय संस्कृतीला नाकारले, भाजपाही त्याच संस्कृतीची सावली वाटू लागल्यास पक्षाचा जनाधार वेगाने कमी होऊ शकतो. जर दोन टक्के मतदारांच्या मनात गैरसमज निर्माण झाल्यास पुढे ९० टक्के लोकही भाजपापासून दूर जातील, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे.