या राज्यात सुरू झाले मित्रपक्षाचे सरकारविरोधात आंदोलन

iया राज्यात सुरू झाले मित्रपक्षाचे सरकारविरोधात आंदोलन

-व्यापाऱ्याच्या खुनावरून राजकारण तापले

प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात समाजमाध्यमांवरील पोस्टवरून झालेल्या वादात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेला अचानक राजकीय वळण लागले. या घटनेनंतर सत्ताधारी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टीच्या नेत्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मंत्री संजय निषाद यांनी थेट आपल्याच सरकाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. त्यांच्या या आंदोलनाला विरोधकांनीही पाठिंबा दिल्याने भाजपा सरकार मोठ्या कोंडीत सापडले. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असतानाच हा वाद उफाळून आल्याने सत्ताधाऱ्यांना चिंता सतावत आहे.

-फरार आरोपींचे एन्काउंटर करा

उत्तर प्रदेश पोलिसांनी या कथित हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. इतर आरोपी हे अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. त्यातच या घटनेला जातीय रंगही प्राप्त झाल्याने भाजपा सरकारची चिंता वाढली आहे. मृत व्यापारी हा निषाद समाजातील (इतर मागासवर्गीय) असल्याचे सांगण्यात येत आहे, तर अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींचा संबंध ‘उच्चवर्णीय’ समाजाशी जोडला जात आहे. या घटनेतील फरार आरोपी पोलिसांना शरण न आल्यास त्यांचे एन्काउंटर करायला हवे, तसेच आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मंत्री निषाद यांनी घेतली आहे. गुन्हेगाराला कोणतीही जात नसते. त्यामुळे आरोपी शरण येत नसतील, तर पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर करायला हवा, अन्यथा ते अजून निष्पाप लोकांची हत्या करतील. त्याचप्रमाणे आरोपींच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर कारवाई होणे तितकेच गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

भाजपाच्या मित्रपक्षाचे आंदोलन

प्रशासकीय व्यवस्थेवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, जिल्हा पातळीवर अतिमागास किंवा अनुसूचित जातींचे फार कमी अधिकारी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे तिथे सातत्याने जातीचा दबाव असतो ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. शुक्रवारी संजय निषाद यांच्या नेतृत्वाखाली गोंडा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आणि धरणे आंदोलन करण्यात आले. इतर गुन्ह्यांप्रमाणेच या प्रकरणातही प्रशासनाने आरोपींवर कुठलीही दयामाया दाखवू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस नेते त्रिलोकी नाथ तिवारी आणि समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी प्रियंका निरंजन यांनी व्यापाऱ्याच्या कुटुंबाच्या मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि आरोपींविरोधात कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर निषाद यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या प्रकरणात ‘कर्तव्यात कसूर’ केल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पीडित कुटुंबाने केलेल्या मागण्या मंत्री संजय निषाद यांनीही मांडल्या होत्या. प्रशासन आणि पोलिसांनी अतिशय नम्रपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या शून्य सहनशीलता धोरणानुसार कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांना आश्वासन देण्यात आले आहे. कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल आणि पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी प्रियांका यांनी सांगितले.

-मृतक व्यापारी विनोद साहनी कोण?

गोंडा जिल्ह्यातील ४५ वर्षीय व्यापारी विनोद साहनी बुधवारी रात्री आपले दुकान बंद करून घराकडे निघाले होते. त्याचवेळी काही लोकांनी त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री तीन जणांना अटक केली. या घटनेबाबत गोंडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, विनोद साहनी यांनी हिंदू देव-देवता आणि संतांबद्दल समाजमाध्यमांवर काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये संताप होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेली तिन्ही आरोपी उच्चवर्णीय समाजातील आहेत. यादरम्यान शुक्रवारी आंदोलन सुरू करण्यापूर्वी मंत्री निषाद यांनी पोलिसांच्या कारवाईचे तोंडभरून कौतुकही केले. आम्ही सरकारमध्ये असल्यामुळेच आरोपींना तातडीने अटक झाली. मात्र, एकाही आरोपीला सोडले जाऊ नये, ही कुटुंबीयांची मागणी आहे. आरोपींवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ लावला पाहिजे. उर्वरित फरार आरोपींचे पोलिसांनी थेट एन्काउंटर केले पाहिजे, जेणेकरून पुन्हा असा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असे मंत्री निषाद म्हणाले.

समाजवादी पक्षाचाही शड्डू

या प्रकरणाने आता तीव्र राजकीय वळण घेतले असून, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने साहनी कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या घटनेवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. भाजपाच्या राजवटीत उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि अराजकता शिगेला पोहोचली आहे. पोलिसांना आपल्या गैरकृत्यांमध्ये सहभागी करून घेऊन भाजपाने केवळ त्यांचे बळच कमी केले नाही, तर त्यांना खोटे गुन्हे आणि एन्काउंटरमध्ये सामील करून पूर्णपणे भ्रष्ट केले आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांवर पलटवार करताना समाजवादी पक्ष केवळ या प्रकरणाचे राजकारण करत आहे. आम्ही सरकारमध्ये असल्यानेच गुरुवारी तातडीने पावले उचलली गेली. सपाने त्यांच्या सत्ताकाळात आम्हाला कधी सत्तेत स्थान दिले नाही, त्यामुळे आता आमच्या प्रश्नांवर बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, असे संजय निषाद म्हणाले. दुसरीकडे- कोणतीही कारवाई कायद्यानुसारच केली जाईल. एन्काउंटर हे राज्याचे धोरण नाही. मात्र, एखाद्या गुन्हेगाराने पोलिसांवर हल्ला केला किंवा त्यांना लक्ष्य केले, तर त्याचे प्रत्युत्तर देण्याचे पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.