काय शिजतेय ? पुन्हा राज्यात ‘त्या’ १४ आमदारांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा

काय शिजतेय ? पुन्हा राज्यात ‘त्या’ १४ आमदारांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा

-आमदारांची मोठी फळी शिंदेंच्या गोटात जाणार

प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील (UBT) २० पैकी १४ आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे सेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे सेनेला आधीच खिंडार पडले असताना आता आमदारांची मोठी फळी शिंदेंच्या गोटात जाणार असल्याची चर्चा आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे सेनेतील १४ आमदारांच्या पक्षांतराबाबत जाहीर वक्तव्य केले. त्यातच शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील काही नेत्यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत पहिली फूट पडली. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर जून २०२६ मध्ये ठाकरे गटाच्या सहा लोकसभा खासदार पक्षांतर करीत शिंदे सेनेत सामील झाले. या घडामोडीनंतर काही दिवसांतच एकनाथ शिंदेंनी सचिन अहिर यांनाही पक्षात घेत, विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची संधी त्यांना दिली.

आता शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरचा नवा अध्याय पाहायला मिळणार असल्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटातील २० पैकी १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असून, एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी पक्ष सोडल्यास त्याचा ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

-१४ आमदारांचीच चर्चा
या पक्षबदलामध्ये १४ आमदारांचा आकडा महत्त्वाचा ठरतो. ठाकरे गटाकडे विधानसभेत २० आमदार आहेत. त्यापैकी दोन-तृतीयांश म्हणजेच १४ आमदारांनी एकत्रितपणे पक्षांतर केल्यास विधिमंडळातील पक्षफुटीच्या नियमांच्या दृष्टीने वेगळे समीकरण तयार होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळेच सध्या राजकीय वर्तुळात १४ आमदारांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या आमदारांनी अज्ञात ठिकाणी शिंदे यांची भेट घेतल्याची सूत्रांनी माहिती आहे. तर मविआच्या अलीकडीच्या बैठकीला ६० पैकी ३७ आमदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे मविआमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या भेटीबाबत किंवा आमदारांच्या पक्षांतराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यांमुळे १४ आमदार शिंदे सेनेत सामील होण्याच्या शक्यतांना बळ मिळाले आहे. “थोडा वेळ थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेंकडे येतील. एकनाथ शिंदे बोलत नाहीत, ते फक्त आपल्या दाढीवरून हात फिरवतात, हे आदित्य ठाकरेंनी कबूल केले आहे. जेव्हा एकनाथ शिंदे दाढीवरून हात फिरवतील, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं असेल,” असे सूचक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र आमदारांच्या पक्षांतराबाबत थेट भाष्य करणे टाळले आहे. “ऑपरेशन टायगरबद्दल फक्त बोलून ते घडत नाही, हे तुम्हाला पूर्णपणे माहीत आहे. ज्या दिवशी हे ऑपरेशन होईल, त्या दिवशी ती सर्वांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज असेल,” असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.

विविध स्तरांवरील नेते शिंदेंचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी तयार असल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्षांपर्यंत आणि मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे सामंत यांनी नमूद केले आहे. “फोडाफोडीचं राजकारण करण्याची आम्हाला गरज नाही. लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, स्वतः एकनाथ शिंदे यांनीही कथित राजकीय ऑपरेशनबाबत भूमिका मांडली आहे. एबीपी माझाच्या ‘माझा इन्फ्रा व्हिजन’ कार्यक्रमात शिंदे यांना या ऑपरेशनबाबत प्रश्न विचारण्यात आला. हे ऑपरेशन सध्या किती वेगाने पुढे सरकत आहे आणि त्याचा ‘गिअर’ कोणता आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी थेट आमदारांच्या पक्षांतराबाबत जाहीर भाष्य केलेले नाही. त्याऐवजी पक्षसंघटना मजबूत करण्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “समृद्धी महामार्गाला १५ किलोमीटर प्रतितासाचा वेग दिला आहे. अधिकृत वेग १५० चा आहे, आम्ही १२० ठेवला आहे; पण त्याचं डिझाईन १५० चं आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही राज्यात महायुतीत, तर देशात एनडीएमध्ये आहोत.” संघटनात्मक बाबीवर भर देत ते म्हणाले, “पक्ष मजबूत होण्यासाठी कार्यकर्ते, संघटना, जनतेत जाऊन केलेलं काम आणि लोकांचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे.”

पक्ष मजबूत केव्हा होतो? कार्यकर्ते, संघटना यांमुळे पक्ष मजबूत होतो. तसेच, काम केल्यामुळे, लोकांमध्ये गेल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवल्यामुळे पक्ष मजबूत होतो. पक्षाची ध्येयधोरणं काय आहेत हे बघून लोक पक्षात येत असतात. अडल्या नडल्याच्या मागे पक्ष, नेता उभा राहतो तेव्हाच लोक येतात,” असेही शिंदेंनी नमूद केले.
म्हणजेच शिंदेंनी १४ आमदारांच्या संभाव्य पक्षांतरावर थेट शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र, पक्षविस्तार आणि संघटना मजबूत करण्याच्या अधिकाराचा त्यांनी उल्लेख केल्याने चर्चेला बळ मिळाले आहे.

-ठाकरे गट म्हणतो…
दरम्यान, ठाकरे गटाने मात्र आमदारांच्या पक्षांतराच्या चर्चांना ठामपणे नाकारले आहे. “या केवळ निराधार अफवा आणि मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी सुरू केलेलं राजकारण आहे. ठाकरे गटातील एकही आमदार पक्ष सोडणार नाही,” असा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या मते, राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारच्या पक्षफुटीच्या चर्चा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत.

त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही शिवसेना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एकीकडे ठाकरे गटातील १४ आमदार शिंदेंच्या गोटात जाणार असल्याची चर्चा तर ठाकरे गटाने हे वृत्त पूर्णपणे फेटाळले आहे. मात्र, शिंदे गटाच्या नेत्यांची वक्तव्ये आणि एकनाथ शिंदेंची भूमिका पाहता, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.