या देशाच्या पंतप्रधानाने गायले चक्क किशोर कुमार यांचे गाणे
-ब्रिक्स (BRICS) परिषदेच्या निमित्ताने भारत दौऱ्यावर
प्रतिनिधी
नवी दिल्ली : ब्रिक्स (BRICS) परिषदेच्या निमित्ताने भारत दौऱ्यावर आलेले मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम सध्या एका खास कारणामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहेत. राजनैतिक बैठका आणि करारांच्या गडबडीत त्यांनी आपले बॉलीवूडवरील प्रेम दाखवून सर्वांची मनं जिंकली. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात अनवर इब्राहिम यांनी किशोर कुमार यांचे ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे अजरामर गाणे गाऊन उपस्थितांना थक्क केले.
१९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीन देवियाँ’ या प्रसिद्ध चित्रपटातील हे गाणे संगीतकार एस. डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केले असून त्याचे शब्द मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. पंतप्रधान इब्राहिम यांनी हे गाणे गायल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
– म्हणाले, बॉलीवूडशी जुने नाते
मलेशियाच्या पंतप्रधानांचे भारतीय चित्रपट आणि संगीतावर जुने प्रेम आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारतीय संस्कृतीबद्दल वाटणारा आदर व्यक्त केला आहे. काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या राजनैतिक भेटीदरम्यान इब्राहिम यांनी ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘बोले चुडियाँ’ हे प्रसिद्ध गाणे पार्श्वभूमीत असलेला एक अधिकृत व्हिडिओ शेअर केला होता.
आपल्या या भारत दौऱ्यात त्यांनी भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे भरभरून कौतुक केले. भारत आणि पाकिस्तानमधील भू-राजकीय (जिओपॉलिटिकल) वादही शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून सुटू शकतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘पंतप्रधान मोदी लोकप्रिय नेते’
१८ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीदरम्यान इब्राहिम यांनी पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा उल्लेख करत म्हटले, “पंतप्रधान मोदी इतके लोकप्रिय आहेत की, मला अनेक लोकांचे संदेश आले होते ज्यांनी मोदींना शुभेच्छा पाठविण्यास सांगितले होते.
मलेशियाने या परिषदेत ‘ब्रिक्स पार्टनर कंट्री’ म्हणून सहभाग घेतला होता. या उच्चस्तरीय चर्चेत जागतिक प्रशासन, शाश्वत विकास, व्यापार, गुंतवणूक आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
–भारत-मलेशिया संबंधांना नवे वळण
२०२२ मध्ये मलेशियाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर अनवर इब्राहिम यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या ऐतिहासिक भेटीमुळे भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध आता ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’ (Comprehensive Strategic Partnership) या उच्च स्तरावर पोहोचले आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान डिजिटल तंत्रज्ञान, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणारे महत्त्वपूर्ण करारही करण्यात आले.


