या राज्यात मुख्यमंत्री यांच्या पक्षाला मिळाले अधिकृत चिन्ह, राजकीय मान्यता

या राज्यात मुख्यमंत्री यांच्या पक्षाला मिळाले अधिकृत चिन्ह, राजकीय मान्यता

-शिट्टी’ (व्हिसल) चिन्ह आरक्षित

प्रतिनिधी
तामिळनाडू : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाने राजकीय पटलावर ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने टीव्हीके पक्षाला अधिकृतपणे ‘राज्यस्तरीय पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकीत गाजलेले पक्षाचे ‘शिट्टी’ (व्हिसल) हे निवडणूक चिन्ह आता टीव्हीकेसाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्यात आले आहे.यामुळे आता कोणत्याही पक्षाला, अपक्षाला शिट्टी हे चिन्ह मिळणार नाही.

या ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीच्या जनतेचे आभार मानले आहेत. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाचा तामिळनाडूच्या राजकारणातील हा उदय म्हणजे एक ‘चमत्कार’ असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री विजय म्हणाले,…

आपल्या समर्थकांना उद्देशून लिहिलेल्या संदेशात विजय म्हणाले, “तब्बल ३५ टक्के मताधिक्य देऊन जनतेने टीव्हीकेला राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवले आहे. जनतेच्या या जनादेशाचा आदर राखत आणि सर्व लोकशाही शक्तींच्या साथीने मी पारदर्शक, प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी कटिबद्ध आहे.” धर्मनिरपेक्ष सामाजिक न्याय आणि जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मतदारांच्या विश्वासावर कायम खरे उतरण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.

अशी मिळाली मान्यता

विधानसभा निवडणुकीतील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर पक्षाला ही संस्थात्मक ओळख मिळाली आहे. आपल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत टीव्हीकेने २३४ पैकी तब्बल १०८ जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पक्षाने राज्यभरात झालेल्या एकूण वैध मतदानापैकी तब्बल ३४.९२ टक्के मते खिशात घातली. ‘निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८’ नुसार राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी किमान ६ टक्के मते आणि २ जागा किंवा किमान ८ टक्के मतांची अट असते. टीव्हीकेने या दोन्ही अटींची पूर्तता मोठ्या फरकाने केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात टीव्हीकेला तात्पुरत्या स्वरूपात एक सर्वसामान्य चिन्ह म्हणून ‘शिट्टी’ देण्यात आली होती. पक्षाच्या सर्व उमेदवारांनी याच चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता निवडणूक आयोगाच्या अधिकृत मंजुरीनंतर हे चिन्ह तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये टीव्हीकेसाठी राखीव झाले आहे. भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये पक्षाचे अधिकृत उमेदवार याच चिन्हावर मैदानात उतरतील.

तामिळनाडूत राज्य पक्ष वाढले

निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयामुळे तामिळनाडूतील अधिकृत राज्यस्तरीय पक्षांची संख्या आता ७ झाली आहे. यामध्ये द्रमुक (DMK), अण्णाद्रमुक (AIADMK), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), विदुथलाई चिरुथैगल काची (VCK), नाम तमिळर काची (NTK), देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) आणि आता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाचा समावेश झाला आहे. एका नवख्या राजकीय आंदोलनाचे प्रमुख सत्ताधारी पक्षात रूपांतर होण्याच्या या प्रवासावर आता निवडणूक आयोगाची अधिकृत मोहोर उमटली आहे.