का म्हणाले राहुल गांधी ? भाजपा व निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडतात
-राहुल गांधींची TMC बाबत पोस्ट
प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज सकाळी केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव व पक्षचिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसमधील दोन्ही गटांना नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव व पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी चालू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत घेतलेला निर्णय आता चर्चेत आला आहे. यासंदर्भात राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करणारी पोस्ट शेअर केली आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव व पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी चालू असून शिंदे गटाचे वकील नीरज कौल युक्तिवाद सादर करत आहेत. या युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देखील शिवसेनेचं पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला न देता गोठवलं का नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर निवडणूक आयोगाचा तो निर्णय कसा योग्य होता, यासंदर्भात एकनाथ शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचं पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्याबाबत टीकात्मक पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयांचा संदर्भ दिला आहे. “आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस. प्रत्येकवेळी तोच पॅटर्न. भाजपा व निवडणूक आयोग मिळून एखादा पक्ष फोडतात. मग त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह हिसकावून घेतलं जातं”, असं राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जर आख्खा पक्षच चोरी होऊ शकतो, तर कोट्यवधी भारतीयांच्या मतांची चोरी होणं काही आश्चर्य वाटण्याची बाब नाही. वोट चोरी. सरकार चोरी. आता पक्षाचीदेखील चोरी. हे आपल्या लोकशाहीच्या पतनाचे प्रतीक झाले आहेत”, अशी टीका राहुल गांधींनी केली.
-पश्चिम बंगालमध्ये दोघांनाही धक्का
निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य
दरम्यान, आपल्या पोस्टमध्ये निवडणूक आयोगालादेखील राहुल गांधींनी लक्ष्य केलं. “निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी ही जनतेच्या निर्णयाचं रक्षण करणं आहे. पण उलट आयोग अशा शक्तींना मदत करत आहे, जे जनतेचा कौलच फिरवत आहेत. ही लढाई फक्त ममता बॅनर्जींची नाही. ही अशा प्रत्येक राजकीय पक्षाची, प्रत्येक मतदाराची लढाई आहे, ज्याला स्वतंत्र व पारदर्शी निवडणुका हव्या आहेत”, अशा शब्दांत राहुल गांधींनी आपली भूमिका मांडली आहे.


