शक्तिप्रदर्शन : काका-पुतन्यांची राष्ट्रवादी माझी म्हणण्यासाठी धडपड

शक्तिप्रदर्शन : काका-पुतन्यांची राष्ट्रवादी माझी म्हणण्यासाठी धडपड

-आज होणार चित्र स्पष्ट

प्रतिनिधी
मुंबई : आम्हीच खरे राष्ट्रवादी’ असा दावा करणारे शरद पवार व अजित पवार हे काका-पुतणे बुधवारी मुंबईत स्वतंत्र बैठकांद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपला पाठिंबा देण्याबाबत ४० आमदारांच्या सह्यांचे आपल्याकडे पत्र आहे. त्यामुळे पक्ष व चिन्ह आमच्याकडेच असा दावा दादा गटाकडून केला जात आहे. तर अनेक आमदार आमच्याकडे परत येत असल्याचा पवार गटाचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पवार गटाची यशवंतराव चव्हाण सभागृहात तर दादा गटाची भुजबळ नॉलेज सिटीत बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी दोन्ही बाजंूच्या प्रतोदांनी व्हीपही बजावला आहे अनेक आमदार रात्रीच मुंबईत आले आहेत. अखेरपर्यंत पळवापळवीचे प्रयत्न सुरू असल्याने त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते.

शरद पवार व अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात तेवढे आमदार त्यांच्या गोटात मंगळवारी सायंकाळपर्यंत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने राज्यभर चाचपणी करून आमदारांचा कल जाणून घेतला. त्यात मोजकेच आमदार आपापल्या गटांची नावे जाहीरपणे सांगत आहेत. मात्र अनेक आमदार, पदाधिकारी अजूनही समोर येऊन स्पष्ट भूमिका घेण्यास तयार नाहीत. सिन्नरचे माणिकराव कोकाटे, देवळालीच्या सरोज अहिरे, अकोले येथील किरण लहाने, पारनेरचे नीलेश लंके, घनसावंगीचे राजेश टोपे, माजलगावचे प्रकाश सोळंके, आष्टीचे बाळासाहेब आजबे, तुमसरचे राजू कोरेमोरे, मोहोळचे यशवंत माने या आमदारांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. बुधवारी होणाऱ्या बैठकीत त्यांच्यासह इतर आमदार, खासदार व पदाधिकारी कोणत्या बैठकीला उपस्थित राहतात.

राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे शिंदे गट अस्वस्थ आहे. अर्थ, ऊर्जा, जलसंपदा, बांधकाम, गृहनिर्माण, कृषी यासारखी मलईदार खाती मिळण्यासाठी नवे मंत्री आग्रही आहेत. मात्र ती देण्यास विद्यमान मंत्र्यांचा विराेध आहे, त्यातही शिंदे गट तडजोडीस तयार नाही. पालकमंत्रिपदावरूनही वाद आहेत. त्यामुळे शपथविधी होऊन ३ दिवस उलटले तरी या ९ मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. अजित पवारांना कोणते खाते द्यायचे, हा कळीचा मुद्दा आहे.

अजित पवार गटाने मंगळवारी ‘प्रतापगड’ नावाने नवीन संपर्क कार्यालय सुरू केले. तिथे शरद पवार यांचे फोटो असलेले बोर्ड लावलेत. त्यावर पवार यांनी ठणकावले. ‘ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत त्यांनी फोटो वापरू नये. जिवंतपणी फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. माझ्या पक्षानेच माझा फोटो वापरावा.’

-आमदारांवर शरद पवार गटाचा दावा
अजितदादांसह ९ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले. पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर २/३ म्हणजे ३६ आमदार असतील तरच या ९ जणांचा बचाव होईल. अन्यथा फुटीर आमदारांची हकालपट्टी होऊ शकते. त्यामुळे बुधवारी ३६ आमदार जमवण्याचे दादांसमोर आव्हान असेल.

८३ वर्षीय योद्धा तुमची वाट पाहतोय.. खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांना परत येण्यासाठी असे भावनिक आवाहन केले आहे.