थेट राहुल गांधींना इशारा: सावरकरांचा अपमान अजिबात सहन करणार नाही

थेट राहुल गांधींना इशारा: सावरकरांचा अपमान अजिबात सहन करणार नाही

-उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली

प्रतिनिधी
नाशिक : ”मी राहुल गांधींना स्पष्ट सांगतो की, तुम्ही आम्ही देशातील लोकशाही वाचवण्याच्या लढाईत एकत्र आलो आहोत. सावकरकर हे आमचे दैवत आहे. कृपा करून त्यांचा अपमान करू नका. तो आम्हाला अजिबात पटणारा नाही. लढायचे असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा स्पष्ट शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधींना ठणकावले. ​

ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे कॉलेज मैदानावर जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस, केंद्रातील भाजप सत्ताधारी सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांसह राहुल गांधींचा समाचार त्यांनी सभेत घेतला. ​​

तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का

उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही. माझ्यावर प्रेम करणारा एक माणूस, शिवसैनिक तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकला नाही. पण तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का बसला. तो शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. जिथे जाल तिथे गद्दारीचा शिक्का दिसेलच.

मी मुख्यमंत्री होण्यासाठी रडत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लोक शपथ घेत आहेत. पण मी मुख्यमंत्री होण्यासाठी रडत नाही. लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे. जागरुक असल्यावर बोलायचे काय हा प्रश्न आहे. बऱ्याच वर्षांपासून मालेगावात आलो आहे. जगभर कोरोना होता. दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबई आणि दुसरा मालेगाव. माझे कर्तव्य आहे आणि मी घरात बसून सर्वांना सांगितले आणि तुम्ही ऐकले होते त्यामुळे धन्यवाद. मुख्यमंत्रीपद येते आणि जाते. पण कुटुंबातील माणसाप्रमाणे जनतेने मला प्रेम दिले. मला वाटत नाही की, हे गद्दारांच्या वाटेला प्रेम येईल का हा प्रश्न आहे.

शिवसेना चोरली, प्रेम चोरू शकत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या शिवसेनेचे नाव, प्रेम चोरले पण माझी जीवाभावाची माणसे चोरू शकत नाही. सत्तेकडे सर्वजण जातात पण मर्दगडी अद्वैय हे सत्तेतून सत्ता नसलेल्यांत आलेला आहे. विश्वास तुटला की, तुटला. एकमेव धागा जो संयुक्त महाराष्ट्राचा भाऊसाहेब आणि प्रबोधनकारांचा आहे तोच धागा महत्वाचा आहे.

किती खोक्याला कांदा खरेदी झाला ‘

उद्धव ठाकरे म्हणाले, कोण म्हणते कांद्याला भाव नाही. गेल्या वर्षी एक कांदा खरेदी झाला. किती खोक्याला कांदा खरेदी झाला. अडीच वर्षे आपले सरकार होते ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम होते की, नाही ते सांगा. कर्जमुक्तीची योजना राबवली होती. द्राक्ष बागायतदारांना फायदा मिळाला नाही पण उर्वरीत शेतकऱ्यांना मिळाली की नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची. पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देणार होतो पण गद्दारी झाली.

मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने शेतात जातो

उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने शेतात जातो. विजेचा पत्ता नाही, शेतीला भाव नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दोरी आणि घंटा बांधलीय. कृषिमंत्री महिलांना शिवीगाळ करतात. सुप्रीया सुळेंना शिवी दिली. तरीही सीएम कृषिमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. द्राक्ष नासली. अवकाळीचा फटका बसला. तरीही केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणतात, अवकाळीचा फटका विशेष काही नाही.

सरकार गद्दारी करून पाडले

उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना एकमागून एक फटका बसत आहे. मविआने पंचनामे तत्परतेने करीत होते. आताचे सरकार चांगले आहे का? का मी सभा घेतोय. सत्ता गेल्याचे दुःख नाही. चांगले काम करणारे सरकार गद्दारी करून पाडले आणि निर्लज्जासारखे भगवा हातात घेवून ते नाचत आहेत. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही. माझ्यावर प्रेम करणारा एक माणूस, शिवसैनिक तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकला नाही. पण तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का बसला. तो शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. जिथे जाल तिथे गद्दारीचा शिक्का दिसेलच.

आणखी किती करणार, उद्योगधंदेही घालवणार

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची अवहेलना आणखी किती करणार, उद्योगधंदेही घालवले. उद्योग बाहेर नेले. मुंबईचे महत्व मारून टाकत आहेत. दिल्लीने डोळे वटारले तर….? सांगायला नको. एक तर निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले नसतील तर मालेगावची सभा बघा. निवडणूक आयुक्त अन्यायाने वागले.

शिवसेना मिंध्यांच्या वडीलांची नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना माझ्या वडीलांनी स्थापन केली, मिंध्यांच्या वडीलांनी नाही. त्यांना स्वःतच्या वडीलांचे नाव घ्यायला लाज वाटती त्यामुळे ते माझ्या वडीलांचे नाव घेता. माझ्या वडीलांनी उभारलेली शिवसेना चोरता. आज देशात एकूण जे वातावरण चालले ते बघितल्यानंतर केंद्र सरकार न्यायालयालाही बटीक बनवण्याचा प्रयत्न करीत होती. पण न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती तिथे बसले आहेत. ज्या क्षणी न्यायालयातील रामशास्त्री बाणा संपेल. त्यादिवशी आपल्या लोकशाहीची श्रद्धांजली वाहण्याची सभा आपल्याला घ्यावी लागेल.