शिवसेना कुणाची?, आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी

शिवसेना कुणाची?, आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी
-संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष

प्रतिनिधी
नवी दिल्ली : ठाकरे गट व शिंदे गटाला लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. युक्तिवाद सादर करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे शिंदे व ठाकरे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला मेल पाठण्यात येणार आहे. तर, शिंदे गटाकडूनदेखील लेखी म्हणणे पाठवण्याबाबत वकिलांशी चर्चा सुरू आहे.

दोन्ही गटांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात सादर केल्यानंतर लवकरच अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रामुख्याने शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर सुनावणी सुरू आहे. तर, सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आज शिंदे व ठाकरे दोन्ही गटांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे सादर केल्यास आजच धनुष्यबाणबाबत निवडणूक आयोग निर्णय देऊ शकतो, अशी शक्यता आहे.

-आजचा दिवस ठाकरे आणि शिंदेसाठी महत्वाचा
दुसरीकडे, ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी आधी आमदारांच्या अपात्रतेबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ द्यावा. त्यानंतरच निवडणूक आयोगाने पक्ष व पक्षचिन्ह कुणाचे?, याबाबत फैसला द्यावा, असा युक्तिवाद गेल्या सुनावणीत केला होता. अन्यथा कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही कपिल सिब्बल म्हणाले होते. त्यामुळे धनुष्यबाणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी निर्णय द्यायचा की नाही?, याबाबत आज निवडणूक आयोग निर्णय घेऊन निकाल राखून ठेवण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस ठाकरे आणि शिंदे गटाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

-पक्षाचे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेतील एक तृतीयांशहून अधिक आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिल्यामुळे आपलीच शिवसेना खरी. त्यामुळे पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळावे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. तर, ठाकरे गटाने मूळ शिवसेना आमचीच म्हणत पक्ष व चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे शिवसेना हे नावच निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. त्यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.