ठरलंय ! राज्यात शिवशक्ती- भीमशक्तीची नवी मोट

ठरलंय ! राज्यात शिवशक्ती- भीमशक्तीची नवी मोट

-प्रकाशजी आपल्याला एकत्र यावेच लागेल

-उद्धव ठाकरेंचा आंबेडकरांना मदतीचा हात

प्रतिनिधी
मुंबई : ‘सत्ता सर्वांनाच हवी, पण त्यासाठी वाट्टेल ते करायचे. लोकशाही तुडवून सत्ता हवी असेल, घटनेची कलमं पायदळी तुडवून सत्ता हवी असेल तर अशी माणसे सत्तेसाठी लायक नाहीत. यांना पहिल्यांदा खाली खेचायला हवे. सर्वच गोष्टी त्यांना त्यांच्या बुडाखाली हव्या आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजपवर केला.

ठाकरे म्हणाले, सामान्यांसाठी प्रकाशजी आपल्याला एकत्र यावेच लागेल. आपण जर पुढे काही करणार नसतील आणि लोकांना जागे करून पुढे काहीच करणार नसू तर आपण ते काम न केलेले बरे आणि आपण ते काम करणार नसू तर आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनीही निवडणुका लागल्या तर आम्ही एकत्र लढू असे स्पष्ट केले.

प्रबोधनकार डाॅट काॅम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. प्रबोधनकारांवर व त्यांच्या विचारांवर पी.एचडी. करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला.

ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि मी व्यासपीठावर एकत्र आलो हे पहिल्यांदा झाले, पण आमचा वैचारिक वारसा एकच आहे. आपला देश कसा विचित्र चालला आहे. प्रबोधनकार आणि डाॅ. आंबेडकर यांनी समाजाला आदर्श दिला. मी आणि प्रकाश आंबेडकर आम्ही त्यांचे नातू आहोत. ते आज एकत्र आले पण तिकडे आजोबा बोलत आहेत. त्यांचे नातू काय करतील मला माहीत नाही.

सीएम शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

ठाकरे म्हणाले, वाट दाखवणारे आदर्श मानायचे की, वाट लावणारे आदर्श मानायचे हाच मोठा प्रश्न आहे. स्वःतचा चेहरा दाखवला तर लोक जवळ येणार नाही म्हणून काही लोक दुसऱ्यांचा मुखवटा घालीत आहे. तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजाची निती वापरली जात आहे.

अत्याचार करणाऱ्यांना शिक्षाऐवजी उमेदवारी

ठाकरे म्हणाले, हल्ली जे चालले ते योग्य नाही. गोमांस खाणाऱ्याला मारले जात आहे पण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी उमेदवारी दिली जात आहे. हे आमचे हिंदुत्व नाही. आपण आदर्श कुणाला मानायचे. पुस्तक वाचून तुम्ही काय करता? आयुष्यात त्या दिशेने काय केले हे महत्वाचे आहे.