होय, राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर होतोय

होय, राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर होतोय

-शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची खंत

प्रतिनिधी
नागपूर : आपण सार्वजनिक जीवनात असतो, तेव्हा अनेक मतभेद होतात. त्यासाठी टोकाला जाण्याची गरज नसते. राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर होत आहे म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला असे दिसत आहे. माझा आग्रह आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी येथे माध्यमांशी बोलताना मांडली.

आव्हाड यांच्या विराेधात भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप करीत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आव्हाड यांच्या विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या विराेधात आव्हाड यांनी ट्विट करीत आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या संदर्भात बोलताना गोऱ्हे यांनी आव्हाडांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी वस्तुस्थिती तपासून निर्णय घेतले पाहिजे. घडलेल्या घटनेबाबत महिलेला काय वाटतं हे तपासून घेतले जावे. पोलिसांना तपासात तथ्य आढळले नाही तर त्या गुन्ह्याची बी समरी म्हणजे क्लोजर रिपोर्ट देता येतो. गर्दीमध्ये अनेकदा लवकर निघण्याच्या प्रयत्नात असा प्रकार होतो. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सांगितले आहे की माझा विनयभंगाचा हेतू नव्हता. त्यामुळे तपास यंत्रणांनी निरपेक्षपणे काम केले पाहिजे, असे मला वाटते असे गोऱ्हे यांनी सांगितले.

नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांकडून पैसे उकळण्याचे समोल आलेले प्रकरण गंभीर आहे. तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली आहे, अशा आशयाची भीती दाखवून काही प्राध्यापकांची फसवणूक करण्यात आली आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. मात्र मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे या सातही प्राध्यापकांनी काही चूक केली नव्हती, तर त्यांनी असे भीतीपायी लाखो रुपये का दिले असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. ते खंडणी मागणाऱ्या प्राध्यापकाला न घाबरता पोलिसांकडे तक्रार करू शकत होते. मात्र त्यांनी घाबरून खंडणी का दिली याचाही विचार होणे गरजेचा आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

या प्रकरणी सखोल तपास होणे गरजेचे आहे. या पूर्वीही नागपूर विद्यापीठामध्ये काही मुलींचे शोषण होऊन पैसे वसूल करून प्रकरण दाबले गेले का, याचा तपास होणे गरजेचे आहे. धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार असल्याची बतावणी करीत, त्यांच्याकडून प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 15 लाख 50 हजार रुपये घेत फसवणूक केल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरुंसह राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.