नेमके काय आहे प्रकरण? महाराष्ट्रात या राजकीय कुटुंबातील वाद शिगेला

नेमके काय आहे प्रकरण? महाराष्ट्रात या राजकीय कुटुंबातील वाद शिगेला

-स्वीडनच्या खासदार नीला म्हणतात, माझा संबंध नाही

प्रतिनिधी
मुंबई : स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘गेल्या दशकभरात ज्यांच्याशी माझा कोणताही संबंध राहिलेला नाही, ते माझ्या राजकीय यशाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत’, अशा शब्दांत नीला विखे यांनी राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेंवर टीका केली होती.

नीला विखे यांनी केलेल्या टीकेनंतर आता सुजय विखे यांनी पलटवार केला आहे.’आम्ही काय फ्लेक्स लावले की त्यांचा जाहीर सत्कार ठेवला? आम्ही फ्लेक्स लावले नव्हते’, असं म्हणत सुजय विखे यांनी खासदार नीला विखेंच्या श्रेय लाटण्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते शनिवारी माध्यमांशी बोलत होते.

–सुजय विखे म्हणाले

“मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की आज महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत, दुष्काळाची परिस्थिती आहे, राज्यात अनेक प्रश्न असताना आमच्या कौटुंबिक विषयांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा व्हावी, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. नीला विखे पाटील या स्वीडनच्या खासदार झाल्या, हा विषय आम्हाला माहिती नव्हता. मात्र, काही पत्रकारांनी स्वतःहून विचारलं की नीला विखे पाटील स्वीडनच्या खासदार झाल्या, त्यावर तुमची काय भावना आहे? तेव्हा कोणीही असेल तर आपण असं म्हणणार का की फार वाईट झालं? असं तर म्हणू शकत नाही. आम्ही एका कुटुंबात राहिलेलो आहोत, त्या अनुषंगाने जर कुटुंबाचा एक सदस्य खासदार झाला असेल तर आम्हाला आनंद आहे मी एवढंच बोललो”, असं सुजय विखे म्हणाले.

“कार्यकर्त्यांच्या समोर भाषण करत असताना मी मार्मिकतेत बोलत होतो. भारतात जरी एका विखे पाटलाचा पराभव झाला असेल तरी परदेशात एक विखे पाटील खासदार झाला. यामध्ये कोणाचं श्रेय घेण्याचा प्रश्न कुठे येतो? त्या स्वतःच्या कर्तृत्वाने तिकडे काम करत आहेत, आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने इकडे काम करत आहोत. मग यामध्ये कोणाच्या श्रेय वादाचा विषय कुठे येतो?”, असा सवाल सुजय विखे यांनी केला.

–हा विषय आता थांबवला पाहिजे
“आमच्या परिवारात जरी आमचा संपर्क नसेल तरी आपल्याकडे आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मोठी होते, तेव्हा आपण चांगली भावना व्यक्त करतो. हा सुसंस्कृतपणा बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला शिकवला आहे, त्याच पालन आम्ही करत आहोत. त्यामुळे एका कौटुंबिक विषयाचं एवढं मोठं राजकारण व्हावं आणि त्यावर सर्वांनी विश्लेषण करावं हे खेदजनक आहे. मला वाटतं की हा विषय आता थांबवला पाहिजे”, असं सुजय विखे यांनी म्हटलं.

“नीला विखे तिकडे खासदार झाल्या ही माहिती आम्ही इकडे पत्रकार परिषद घेऊन दिली का? आम्ही फटाके फोडले का? आम्ही काय फ्लेक्स बोर्ड लावले का? की आम्ही त्यांचा जाहीर सत्कार ठेवला? नाही”, अशा शब्दांत सुजय विखे यांनी नीला विखे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

-लंकेंवर आरोप

खासदार निलेश लंके यांचा डायलॉग फिक्स आहे. त्यांना स्वीडन कुठे आहे हे देखील माहिती नाही. त्यामुळे त्यांनी त्यावर काही भाष्य करू नये. दुसरा मुद्दा म्हणजे मागच्या दोन वर्षांत हे खासदार या जिल्ह्यासाठी एक रुपयांचा निधी आणू शकलेले नाहीत. त्यामुळे कुठेतरी कौटुंबिक वादामध्ये पडून राजकारण करणं हे चुकीचं आहे”, असं म्हणत सुजय विखे यांनी निलेश लंकेंनाही प्रत्युत्तर दिलं.