या पदवीधर मतदार संघात भाजप व ‘राष्ट्रवादी’ आमनेसामने

  • या पदवीधर मतदार संघात भाजप व ‘राष्ट्रवादी’  आमनेसामने

-भाजपने आखली व्यूहरचना

प्रतिनिधी
पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे असला, तरी भाजप या जागेसाठी आग्रही आहे. गेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्त्व भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असल्याने पुन्हा हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजप तयारीला लागले आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ हे आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. २०२० च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड हे विजयी झाले होते. त्यावेळी महाविकास आघाडीतील तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून निवडणूक लढविली होती. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे.

या मतदार संघाचे विद्यमान आमदार अरुण लाड हे ‘राष्ट्रवादी’मध्ये असले, तरी त्यांचे चिरंजीव हे शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शरद लाड हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ‘राष्ट्रवादी’चा उमेदवारीसाठी दावा कायम आहे. भाजपही निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मात्र, राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला झाला असल्याने भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. ‘राष्ट्रवादी’कडून कोल्हापूरचे प्रदीप उर्फ भय्या माने यांचे नाव चर्चेत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ या महायुतीतील मित्रपक्षांमध्येच संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे पदवीधर मतदार संघ हा भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा मानला जातो. या मतदार संघाचे भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेतृत्त्व केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने भाजपसाठी हा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेणे, हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे.

हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. त्यासाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ नेमण्यात आले आहेत. भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आढावा बैठक घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांवर मतदार नोंदणीसाठी जबाबदारी दिली आहे. या दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पुणे महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाने १५००, तर पिंपरीतील नगरसेवकाने किमान ५०० मतदारांची नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारांची नोंदणी करण्यात येत आहे.