आकडेवारी समोर : या पाच राज्याच्या निवडणुकीत ५२९ कोटींचा खर्च

आकडेवारी समोर : या पाच राज्याच्या निवडणुकीत ५२९ कोटींचा खर्च

-अधिक रक्कम एकट्या पश्चिम बंगालमध्ये खर्च

प्रतिनिधी
नवी दिल्ली : मे महिन्यात पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात भाजपाने तब्बल ५२९ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या संपूर्ण खर्चापैकी निम्म्याहून अधिक रक्कम एकट्या पश्चिम बंगालमध्ये खर्च करण्यात आली. भाजपाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अधिकृत निवडणूक खर्च अहवालातून ही बाब उघड झाली.

भाजपाने आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांसाठी केलेल्या खर्चाचा अहवाल समोर आला. या अहवालानुसार, पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने पाचही राज्यांमध्ये मिळून तब्बल ५२९.३८ कोटी रुपये खर्च केल्याचे उघड झाले. यापैकी तब्बल २८६ कोटी रुपये एकट्या पश्चिम बंगालमध्ये खर्च करण्यात आल्याचे दिसून आले. म्हणजेच भाजपाच्या एकूण निवडणूक खर्चातील निम्म्याहून अधिक रक्कम पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारावर खर्च झाली. विशेष बाब म्हणजे, या निवडणूक कालावधीत भाजपाला १,४९४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही भाजपाकडे बँक खात्यातील शिल्लक आणि हातातील रोख रक्कम मिळून ७,६८९.०६ कोटी रुपये असल्याचे पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

-निवडणूक खर्चाचे नियम

निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा निश्चित केलेली असते. मात्र, राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी एकूण खर्चाची अशी कमाल मर्यादा नाही. त्यामुळे पक्ष आपल्या संघटनात्मक आणि प्रचारात्मक गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करू शकतात. निवडणूक संपल्यानंतर राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडे खर्चाचा सविस्तर हिशेब सादर करावा लागतो. त्यामध्ये प्रवास, सभा, जाहिराती, प्रचार साहित्य आणि इतर निवडणूकविषयक खर्चाचा समावेश असतो. त्यातून कोणत्या पक्षाने निवडणूक काळात प्रचारासाठी नेमका किती खर्च केला याची माहिती सार्वजनिक होते.

-निवडणुकीनंतर भाजपाकडे किती रक्कम?

निवडणूक खर्चासोबत भाजपाच्या आर्थिक स्थितीवरही या आकडेवारीमुळे लक्ष जाते. निवडणूक कालावधीत पक्षाला १,४९४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता आणि निवडणुकीनंतर पक्षाच्या बँक खात्यातील शिल्लक व रोख रक्कम मिळून ७,६८९.०६ कोटी रुपये असल्याचे आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले. म्हणजेच, प्रचंड खर्च करून भाजपाकडे निवडणुकीनंतर मोठी आर्थिक शिल्लक होती. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने पहिल्यांदाच सत्ता मिळवली. या निवडणुकीत पक्षाने २१७.१६ कोटी रुपये सर्वसाधारण पक्षाच्या प्रचारावर खर्च केले. तसेच उमेदवारांशी संबंधित खर्चासाठी ६९.८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामध्ये उमेदवारांना देण्यात आलेल्या ५८.८० कोटी रुपयांचाही समावेश आहे.

–इतका झाला खर्च

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालानुसार, भाजपाने आसाममध्ये ९६.२६ कोटी रुपये, केरळमध्ये ८२.६७ कोटी रुपये, तमिळनाडूमध्ये ५१.५६ कोटी रुपये, तर पुद्दुचेरीमध्ये ११.८९ कोटी रुपये खर्च केले. या आकडेवारीवरून भाजपाने दक्षिणेकडील राज्ये आणि आसामच्या तुलनेत एकट्या पश्चिम बंगालमधील प्रचारावर सर्वाधिक आर्थिक ताकद पणाला लावल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने केरळ आणि तमिळनाडू वगळता पश्चिम बंगालसह आसाम व पुदुच्चेरीत मोठी मुसंडी मारली होती. २९४ सदस्यांच्या बंगालच्या विधानसभेत निम्म्यांहून अधिक जागांवर जिंकून भाजपाने सत्ता स्थापन केली; तर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली.

-भाजपाने या राज्यांत मिळवली सत्ता?

गेल्या दीड दशकांपासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र बंगाली मतदारांनी भाजपाच्याच गळ्यात विजयाची माळ टाकल्याचे दिसून आले. या पराभवानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचा आरोप केला होता. तसेच मतदारांना विविध प्रलोभने दाखवून भाजपाने त्यांची मते विकत घेतल्याची टीकाही त्यांनी केली होती. दुसरीकडे- आसाममध्येही भाजपाने सलग दुसऱ्यांदा सत्ता राखत तब्बल ८२ जागा जिंकल्या; तर काँग्रेस १९, बीओपीएफ १०, एजीपी १० आणि एआययुडीएफला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले. पुद्दुचेरीत भाजपाचे चार आमदार निवडून आले असले तरी आर. एन. काँग्रेसबरोबरच्या युतीत त्यांना यश मिळाले. तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाच्या पदरी निराशा आल्याने दक्षिण भारतात पक्ष वाढविण्याच्या प्रयत्नांना पुन्हा खीळ बसली. तमिळनाडूत गेल्या वेळी चार जागा जिंकलेल्या भाजपाला यंदा केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. तमिळनाडूत पक्ष वाढविण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले. तरीही पक्षाच्या पदरी निराशा आली.