हा नेता म्हणतो, कायदा-सुव्यवस्था कुणाच्या कोठ्यावर नाचते

हा नेता म्हणतो, कायदा-सुव्यवस्था कुणाच्या कोठ्यावर नाचते

-मग, बार्शीतील पीडितेला न्याय का नाही?

प्रतिनिधी
मुंबई : चुंबन प्रकरण तसेच अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणाचा तपास करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार SIT स्थापन करते. मात्र, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बार्शीतील पीडितेला न्याय द्या म्हणून मी ट्विट केले तर माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोणाच्या कोठ्यावर नाचते, हे यावरुन लक्षात येते, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, बार्शीतील मुलीवर गुंडांनी घरात घुसून कोयत्याने वार केले. तिच्या आई-वडिलांशी मी बोललो आहे. अजूनही मुख्य आरोपी बाहेर आहेत, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी दिल्लीत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी मी ट्विट केले. मुलीला न्याय मिळावा, असा माझा हेतू होता. मात्र, पीडितेला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याएवजी माझ्यावर गुन्हा दाखल केला.

कायदा-सुव्यवस्था कुणासाठी?

संजय राऊत म्हणाले, आम्हाला न्याय मिळाल नाही तर इच्छा मरणाची परवानगी द्या, असा आक्रोश पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन मी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना केले आहे. स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तीसाठी सरकार SIT स्थापन करते. चुंबन प्रकरणाची तातडीने दखल घेऊन SIT स्थापन केली जाते. पण, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेला न्याय मिळावा म्हणून तिचा फोटो ट्विट केला की गुन्हा दाखल होतो. यावरुन या राज्यात कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते, हे लक्षात येते.

संजय राऊत म्हणाले, गुढी पाढवा एका दिवसावर आला आहे. तरीही सर्वसामान्यांना अजूनही आनंदाचा शिधा मिळालेला नाही. सर्वसामान्य अजूनही दिवाळी शिधाची वाट पाहत आहेत. शिंदे सरकारमध्ये शिधा फक्त खोक्यात मिळतो, तोही फक्त आमदारांनाच मिळतो. सर्वसामान्यांना काहीही मिळत नाही. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा आहे. त्या सभेत उद्धव ठाकरे या सर्व विषयावर बोलतील.

संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विकत घेण्यासाठी भाजपने मोठा सौदा केला. त्यासाठी पैसे, निवडणूक आयोगाचा वापर केला. दिल्लीत विरोधी पक्षाचे सरकार आहे म्हणून त्या सरकारचा अर्थसंकल्प रोखला. राहुल गांधींनी लोकशाहीविषयी चिंता व्यक्त केली म्हणून त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. देशाच्या इतिहासात असे यापूर्वी कधीही झाले नाही.

गौतम अदानीला सरकारकडून संरक्षण

संजय राऊत म्हणाले, गौतम अदानी या एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संपूर्ण भाजप पक्ष कामाला लागला आहे. गौतम अदानीला सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. दुसरीकडे, आम्हीही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही. भाजप आमदार राहुल कौल यांनी दौंड येथील साखर कारखान्यात जवळपास 175 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याचे पुरावे मी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. दौंड येथे या विषयावर लवकरच माझी जाहीर सभाही होणार आहे.