या पक्षाची एन्ट्री; शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत तापणार
– शैक्षणिक सुविधांचा दाखल देत अनेकजण मैदानात
गजानन ढाकुलकर
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपची उमेदवारी दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार यांना जाहीर झाली. या निवडणुकीत आता आम आदमी पार्टीनेही उडी घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
आपतर्फे डाॅ. देवेंद्र वानखेडे यांनी गुरुवारी समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. दिल्लीत केलेल्या शैक्षणिक सुविधांचा दाखल देत वानखेडे मैदानात उतरले आहे. तर भाजपातर्फे नागो गाणार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय झाल्यामुळे नागपुरात अस्वस्थता आहे. नागपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गंगाधरराव नाकाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर नाराजी आहे.
शिक्षक भारती, शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही मैदानात आहे. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले किती मते खातात यावर सारा खेळ अवलंबून आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विश्वनाथ डायगव्हाणे यांनी 8 महिन्यांपूर्वीच या निवडणुकीसाठी चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांची उमेदवारी जारी केली. शिक्षक भारतीचे कपिल भारती यांनी राजेंद्र झाडे यांची महिनाभरापूर्वी घोषणा केली. या निवडणुकीच्या निमित्ताने झाडे हे तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत.
शिक्षक भारतीने राजेंद्र झाडेच यांना उमेदवारी दिलेली आहे. मागील निवडणुकीत 35 हजार 9 मतदार होते. यावर्षी 39 हजार 406 मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहिता राहणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे आता काँग्रेसने शिक्षक भारतीला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली होती. पण महाविकास आघाडीने एकत्रीत निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे झाडे नाराज असल्याचे कळते.


