नबाब मालिकांवरून खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, वेगळा अर्थ काढू नका

नबाब मालिकांवरून खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, वेगळा अर्थ काढू नका

-शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद

प्रतिनिधी
नागपूर : देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा वेगळा अर्थ काढू नका. नवाब मलिक विधानसभेत कुठे बसले. हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यांच्याकडे विधानसभेत बसण्याचा अधिकार आहे. याशिवाय, विधानसभेत कुणाला भेटल्यानंतर ते आमच्याकडे आल्याचे म्हणणे म्हणजे दिशाभूल करणारी बाब आहे. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले असेल तर त्याचा फार काही वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या अजित पवार गटातील समावेशाचा मुद्दा सध्या चर्चेचा ठरला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचा सरकारमध्ये समावेश मान्य नसल्याचं अजित पवारांना थेट पत्र लिहून कळवलं असताना दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते मात्र नवाब मलिक अद्याप आमच्याकडे आले नसल्याचं सांगत आहेत. खुद्द अजित पवारांनीही अशाच प्रकारची भूमिका मांडली असताना आता अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले,‘जे घडले ते सगळ्यांना माहिती आहे. नवाब मलिक या काळात कुणाच्याही बरोबर नव्हते. त्यांचा या सगळ्याशी काहीही संबंध आला नाही. वैद्यकीय कारणासाठी त्यांना जामीन मिळाल्यानंतर सगळेच त्यांना भेटायला गेले. सहकाऱ्याच्या प्रकृतीची विचारपूस करणे हे आमचे कर्तव्य होते.’

-मलिकांशी राजकीय चर्चा नाही

अजित पवार गटाला नवाब मलिक यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा करायची नाहीये. विधानसभेत ते आमदार म्हणून आल्यानंतर जुने सहकारी एकमेकांना भेटणे स्वाभाविक आहे. नवाब मलिकांची भूमिका काय आहे यासंदर्भात आम्ही चर्चा केलेली नाही. ते वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे आम्हाला यावर त्यांच्याशी चर्चा करायची नाही. त्यांच्या प्रकृतीची भेट घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतलेली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिकांची काय भूमिका असेल, यावर मी भाष्य करू इच्छित नाही,’ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

काँग्रेसला लगावला टोला

विरोधक हताश होऊन दुसरा कुठला मुद्दा नसल्यामुळे हे सगळे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगाकडे आम्ही नवाब मलिकांशी संबंधित कोणतीही कागदपत्र दिलेले नाही. ज्यांनी सल्ला द्यायची गरज नाही तेही सल्ला देत आहेत. त्यांनी आपला पक्ष आधी व्यवस्थित चालवावा. दुसऱ्या लोकांना सल्ला देण्यात काय अर्थ आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरून हे स्पष्ट झाले आहे की काँग्रेसमध्ये आता सामना करण्याची क्षमता राहिलेली नाही, असा टोला पटेल यांनी काँग्रेसला लगावला.