काय झाले नेमके? नागपुरातही फडणवीस, अजितदादांच्या संयुक्त बॅनरची चर्चा
-वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छा
प्रतिनिधी
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना राज्यभरातून शुभेच्छा येत आहेत. दोन्ही नेत्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी त्यांच्या समर्थकांडून बॅनर्सबाजी करण्यात आली आहे. मात्र, सध्या राज्यात चर्चा रंगली आहे ती, नागपूरमध्ये लागलेल्या बॅनरची. या बॅनरवर शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही फोटो लावण्यात आलेले आहेत. इतकेच नाही तर, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काढण्यात आलेल्या फोटोचाही यात समावेश आहे.
उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून बॅनर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. दरम्यान, नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूरमधील अजित पवार गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. नागपुरच्या सेंट्रल एवेन्यूवर हा बॅनर पाहायला मिळत आहे.
-काय म्हटले बॅनरमध्ये
हि दोस्ती तुटायची नाय… राजकारणातील दादा अजित दादा व राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा प्रकारचा मचकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यभर हे बॅनर आणि त्यावरील मचकूराची चर्चा रंगली आहे.


