विधानभवनात कुणी कुटले, कुणाविरुद्ध टाळ, झक्कास खेळली फुगडी
-टाळ, दिंडीचा ताल सत्ताधाऱ्यांविरुद्ध
प्रतिनिधी
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने सरकारविरोधात टाळ वाजवीत दिंडी आंदोलन केले.
सत्ताधारी सरकारचा धिक्कार केला. भूखंड घ्या… कुणी गायरान घ्या.. खोक्याने घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या.., कुणी गुवाहाटीला जा कुणी सुरतला जा.. असे स्वरचित अभंग गात सत्ताधारी पक्षाविरोधात सूर आवळला.
विधिमंडळ अधिवेशनाचा कालचा दिवस सीमावाद प्रश्न, भूखंड घोटाळा आणि सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या तू तू- मै मै ने गाजला. आज सकाळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभंग गात आंदोलन केले. भूखंड घोटाळ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड यांच्या नावाने शिमगा करीत त्यांचा निषेध केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील काँग्रेस कार्यालयाजवळून फुगड्या घालत, रिंगण करीत निषेध मोर्चाला सुरुवात झाली. सर्व आमदारांनी डोक्यात पांढऱ्या टोप्या परिधान करून गळ्यात टाळ लटकवून विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ येऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
‘मोदी का नाम जपना, पराया माल अपना, लवकर लुटा, तुम्ही लवकर लुटा, महाराष्ट्राला लुटा तुम्ही जनतेला लुटा, गुवाहाटीला चला तुम्ही सुरतेला चला, खोके घ्यायला चला’, अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे, यशोमती ठाकूर, नाना पटोले, अमोल मिटकरी, भास्कर जाधव, प्राजक्त तनपुरेंसह इतर नेत्यांचा सहभाग होता.


