वाचा सविस्तर : २८ फेब्रुवारीला मोदी करणार यवतमाळ येथे ही मोठी घोषणा
-यवतमाळ येथील भारी गावाला देणार भेट
गजानन ढाकुलकर/ विवेक पाटील
नागपूर/यवतमाळ : केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (२८ फेब्रुवारी) हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचेही या वेळी वितरण होणार आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना राबविली जात आहे. सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७ हजार ६३८ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.


