वडेट्टीवार व दानवेत बिनसले : हे ठरले प्रमुख कारण?
-ओबीसी प्रमाणपत्राचे पुरावे सादर करावे
प्रतिनिधी
नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ओबीसी बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असुन असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. वड्डेटीवार यांनी माध्यमांना माहिती दिली असेल तर त्याचे पुरावे सर्वांसमोर सादर करावे, असे आवाहन दानवे यांनी केले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी व्यक्तिशः माझ्यावर केलेले आरोप पूर्णतः खोटे असून त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल तर त्यांनी याचे पुरावे सादर करुन सत्य माहिती सर्वांसमोर सादर करावी. जेणेकरून वास्तव परिस्थिती समोर येईल. तसेच विरोधी पक्षनेते यांनी सत्य माहिती घेऊन असे आरोप करावे, असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे. शिवसैनिक म्हणूनच मी राज्यभर फिरतो. मी कोणत्याही जातीचा नेता नसून आतापर्यंत कसल्याही आरक्षित जागेचा मी लाभ घेतलेला नाही. नगरसेवक ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचलो तरीही खुल्या गटातून मी निवडून आलेलो आहे, अशी या वादावर दानवे यांनी टिप्पणी केली.
-मराठा समाजाला आरक्षण देताना नुकसान नको
मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे नुकसान होईल असा निर्णय शासनाने घेऊ नये, यामुळे मराठा समाजासह इतर समाजाचे सुद्धा नुकसान होऊ शकते. मराठवाड्यातील शेतकरी समाजाचा उल्लेख अजूनही कुणबट म्हणून केला जातो, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हा पुरावा फायदेशीर ठरू शकतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


