युती होवो न होवो : वंचितचा रामटेकसाठी उमेदवारी अर्ज दाखल

युती होवो न होवो : वंचितचा रामटेकसाठी उमेदवारी अर्ज दाखल

गजानन ढाकुलकर
नागपूर : नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज 11 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 19 अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. राज्यात वंचित बहुजन आघाडीची सोयरीक अद्याप जमली नाही. मात्र, एकला चलोचा नारा देत रामटेक लोकसभेसाठी वंचितने भाजपा सोडून आलेले शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या धडकीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे व शंकर चहांदे एकाच गावातील आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), संतोष चव्हाण (अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), श्रीधर साळवे (भीम सेना), सचिन वाघाडे (अपक्ष), ॲड. पंकज शंभरकर (अपक्ष), विशेष फुटाणे (बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी) आणि आदर्श ठाकूर (अपक्ष), किवीनसुका सुर्यवंशी (देश जनहित पार्टी) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूरसाठी आज 75 अर्जांची तर आतापर्यंत एकूण 347 अर्जांची उचल करण्यात आली.

रामटेकसाठी आज सहा अर्ज

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज 6 अर्ज स्वीकारण्यात आले. रामटेकसाठी एकूण दाखल अर्जांची संख्या 7 झाली आहे.
रामटेकसाठी गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), संदीप गायकवाड (अपक्ष), आशिष सरोदे (भीमसेना) यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 7 अर्ज दाखल करण्यात आले रामटेकसाठी आज 42 अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत रामटेकसाठी एकूण 205 अर्जांची उचल करण्यात आली.

नामनिर्देशनपत्रे 27 मार्चपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.