या महिला नेत्या किरीट सोमय्यावर भडकल्या
-सोमय्यांनी 7 दिवसांत आरोप सिद्ध करून दाखवावेत
प्रतिनिधी
मुंबई : किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आक्रमक झाल्यात. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आलेत. त्यामुळे आज दादर पोलिसांसमोर मी चौकशीला जाणार नाही. किरीट सोमय्यांनीच 7 दिवसांत आरोप सिद्ध करुन दाखवावेत. तोंड लपवू नये, असे आव्हान पेडणेकरांनी माध्यमांशी बोलताना दिले.
किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील एसआरएचे 6 गाळे बेकायदा हस्तगत केल्याचा आरोप किरट सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणी, काल त्यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज किरीट सोमय्यांनी ट्विट करत किशोरी पेडणेकरांना आजही दादर पोलिसांनी चौकशीला बोलावल्याचे सांगितले होते.
-दबावाला बळी पडणार नाही
आज माध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या, माझ्याविरोधात निव्वळ खोट्या माहितीच्या आधारावर बातम्या चालविल्या जात आहे. केवळ दबावतंत्र चालू आहे. तोंड बंद कर, बोलायच नाही, अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे. मात्र, मी दबावाला बळी पडणार नाही. त्यामुळे आज चौकशीसाठी मी पोलिस स्टेशनमध्ये जाणार नाही. एखाद्या सजग नागरिकाला काही शहानिशा करायची असल्यास मी नक्की त्याला उत्तर देईल.
-संविधानावर पूर्ण विश्वास
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा न्यायव्यवस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. तसेच, पोलीस प्रशासनावरह पूर्ण विश्वास आहे. मात्र, निव्वळ राजकारणासाठी खोटी माहिती देऊन विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत.
-एकाही आरोपात तथ्य नाही
आपल्यावरील आरोपासंदर्भात किशोरी पेडणेकर म्हणाल्या, एसआरचे गाळे बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. अशाच एका सुनावणीदरम्यान स्वत: मुंबई झोपडपट्टी प्राधिकरणाने स्पष्ट केले की, माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. तरीदेखील सोमय्या विनाकारण आरोप करून याबाबतची चौकशीची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करीत आहे.
-त्या गाळ्यांना टाळे लावून दाखवा
पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिले की, माझ्याविरोधातील आरोप सात दिवसांत सिद्ध करून दाखवा आणि वरळीतील त्या गाळ्यांना टाळे लावून दाखवा. निव्वळ आरोप करून नंतर तोंड लपवू नका.
-नेहमीच राष्ट्र प्रथम
भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छाबद्धल आभार मानतो. पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे, असे ट्विट करत किरीट सोमय्यांनी पेडणेकरांवर आरोप केले होते. त्याचाही समाचार पेडणेकरांनी घेतला. पेडणेकर म्हणाल्या, आपला पती सोडून इतरांना भाऊ मानणे ही आपली परंपरा आहे. मात्र, राष्ट्राच्या नावाखाली या सोमय्यांनी पूर्वी ज्यांच्यावर आरोप केले. ते सर्व आता भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन क्लिन झालेत. आता सोमय्या त्यांच्यावर आरोप का करीत नाही. आता त्यांचे राष्ट्र कुठे गेले, असा बेगडीपणा मला कधीही जमला नाही.


