महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: ‘व्हॅलेंटाइन डे’पासून सलग सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: ‘व्हॅलेंटाइन डे’पासून सलग सुनावणी
-सर्व प्रेमाने होईल, असा आमचा विश्वास

प्रतिनिधी
मुंबई: अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, व्हॅलेंटाइन डेपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. सर्व प्रेमाने होईल, असा आमचा विश्वास आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आज सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई हे नेतेदेखील सर्वोच्च न्यायालयात हजर झाले होते. ठाकरे गटाकडून एका मुद्द्यावर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठाकडे सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

कपिल सिब्बल म्हणाले, ठाकरे गटाला या खटल्यातील एका मुद्द्यावर सात न्यायमूर्तींचे खंडपीठ हवे आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत अधिकाराचा हा मुद्दा आहे. विधानसभेच्या पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही?, हे या खटल्यातून स्पष्ट होणार आहे.

2016 च्या अरुणाचल प्रदेशच्या नबाम रबिया खटल्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले होते. नबाम रबिया खटल्यामध्ये निकाल पाच न्यायमूर्तींच्या पीठाचा होता. अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील स्थिती वेगळी असल्याने या मुद्द्यावर अधिक खल व्हावा. म्हणून 7 न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन करावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडल्यानंतर घटनापीठाने ही सुनावणी पुढे ढकलत असल्याचे सांगितले. घटनापीठाने पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला निश्चित केली. यावर कपिल सिब्बल यांनी याच दिवशी ‘व्हॅलेंटाइन डे’ असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे ही तारीख अत्यंत शूभ असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले.