भाजपाच्या या यादीत नवनीत राणांचे नाव नाही : कारण काय ?

भाजपाच्या या यादीत नवनीत राणांचे नाव नाही : कारण काय ?

-खासदार नवनीत राणा यांचा अपेक्षाभंग

प्रतिनिधी
मुंबई  : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा अखेर अपेक्षाभंग झालाय. मनसे पाठोपाठ नवनीत राणा यांनीही मस्जीदीवरील भोंग्याविरोधातील आंदोलनात उडी घेत ठाकरे यांना आव्हान दिले होते. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यानंतर वेळोवेळी भाजपच्या बाजूनेच भूमिका घेतली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नवनीत राणा यांना स्थान देण्यात आलेले नाही. याचवेळी भाजपने राज्यात पाच महिलांना उमेदवारी दिलीय.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या गेल्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्यावर निवडून आल्या. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भाजपच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा नवनीत रण यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. यामुळे नवनीत राणा चर्चेत आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच नवनीत राणा यांनी आगामी निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढविण्याचे जाहीर केले. मात्र, त्याच्या या अपेक्षांना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खो घातला. अमरावती मतदार संघावर आपला दावा सांगत ‘मोदीजी से बैर नहीं, राणा तेरी खैर नही’, अशी टीका माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केली होती.