बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य; 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादी पक्ष…?
– खासदार, आमदार जास्त, पक्ष त्याचाच
प्रतिनिधी
नागपूर : येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार आहे. चिन्हाचा निर्णयही त्यांच्याच बाजूने येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बीड येथील जाहीर सभेत सांगितले. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, निवडणूक आयोग हा निष्पक्ष असतो. त्यामुळे प्रफुल्ल पटेल म्हणाले, त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आमदार म्हणजे पक्ष नसतो. तर, संघटना म्हणजेच पक्ष असतो व संघटना माझ्यासोबत आहे, असा दावा केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांनी पक्षाबाबत जे सांगितले ते चुकीचे आहे. पक्षात संघटनेचे महत्त्व आहेच पण पक्षात लोकप्रतिनिधींचे महत्त्व सर्वाधिक आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या पक्षाचे खासदार, आमदार जास्त, पक्ष त्याचाच असा नियम आहे. निवडणूक आयोग नियमानुसारच काम करेल. ज्याकडे आमदार, खासदार जास्त पक्ष त्याचाच असतो. अजित पवार गटाकडे आमदार जास्त असतील. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही पुरावे असतील. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असेल. मात्र, योग्य तो निर्णय निवडणूक आयोग घेईल.
संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंचे कॅप्टन हे संजय राऊत आहे. हेच संजय राऊत त्यांच्याच शिवसेना पक्षाचे जहाज बुडवायला निघाले होते. त्यामुळेच जहाजातील प्रवाशांनी पटापट जहाज सोडले. जहाज सोडले नसते तर ते बुडाले असते. त्यामुळे पक्ष सोडला म्हणून उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी बंडखोरांवर टीका करण्यात अर्थ नाही.


