नागपूर जि. प. च्या मिनी मंत्र्यांची निवड १ नोव्हेंबरला

नागपूर जि. प. च्या मिनी मंत्र्यांची निवड १ नोव्हेंबरला
-पुन्हा लागणार पक्षश्रेष्टींचा कस
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्तापक्ष काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागला. आता मिनी मंत्री अर्थात चार विषय समिती सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम १ नोव्हेंबरला घोषित करण्यात आला आहे.

त्यामुळे पक्षश्रेष्टींचा चांगलाच कस लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने चार विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जारी केला. अध्यक्ष व उपाध्यक्ष पद न मिळालेल्यांनी आता विषय समिती सभापतिपदाकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग चालविली. येथे जुन्याजाणत्या व वरिष्ठांना डावल्यास सत्तापक्षामध्ये पुन्हा एकदा बंडोबांना थंड करणे पक्षाला कठीण होऊन जाईल. विद्यमान सदस्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ जुलैला पूर्णत्वास आला. परंतु, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने तत्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्षांसोबतच विषय समिती सभापतींना शासनाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. नुकतीच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.

आता समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि शिक्षण व वित्त या विभागांसाठी चार समिती सभापतींची निवड होणार आहे. यापैकी समाजकल्याण आणि शिक्षण समिती सभापतिपदासाठी अनेकजण इच्छुक आहे. त्यासंदर्भात लॉबिंगही काहींनी आता वरिष्ठांकडे सुरू केली. यावेळी सहपक्ष राष्ट्रवादीची दोन सभापतिपदांची मागणी आहे. अपक्षांची न्यायीक अपेक्षा आहे. काँग्रेसकडून त्यांच्या मागणीची पूर्तता होते किंवा नाही, हे बघणे औचित्याचे ठरणार आहे. परंतु, सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी सत्तापक्षात डझनभराहून अधिक जण इच्छुक आहे़ यांचा येथेही हिरमोड झाल्यास पुन्हा सत्तापक्षामध्ये बंड उफाळेल. वरिष्ठ नेत्यांना आता अध्यक्षपदासाठी डावलेल्या ज्येष्ठ सदस्या शांता कुमरे यांनाही न्याय द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कुमरे यांना सभापतिपद देते किंवा नाही हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.

-असा राहील निवडणुकीचा कार्यक्रम
१ नोव्हेंबरला उपविभागीय अधिकारी (नागपूर ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडेल. त्यासाठी सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकारण्यात येईल. दुपारी तीन वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. दुपारी ३.०५ ते ३.१५ यावेळेत नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. ३.१५ ते ३.३० यावेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. गरज भासल्यास दुपारी ३.४५ वाजतापासून मतदानाला सुरुवात होईल.