नागपुरात सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेलांवरून स्पष्टच बोलल्या
-अपयश माझ्यामुळे असेल तर स्वीकारते
प्रतिनिधी
नागपूर : प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणती घुसमट होत होती ते त्यांनाच माहीत, आठवड्यातून तीन वेळा ते शरद पवारांच्या दिल्लीतील घरी भेटायचे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. पक्षाला आतापर्यंत यश मिळालं ते तुमच्यामुळे मिळालं आणि अपयश माझ्यामुळे मिळालं असं जर तुम्ही समजत असाल तर ते मी स्वीकारते असेही सुप्रिया सुळे यांनी मान्य केले. तर यालाच लीडरशीप म्हणतात, असा उल्लेखही त्यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, गेली सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध आहे.
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणती घुसमट होत होती ते त्यांनाच माहीत असेल. आठवड्यातून तीन वेळा ते शरद पवारांच्या दिल्लीतील घरी भेटायचे. सहा जनपथ जसे माझे घर होते तसेच त्याचे पण घर होते. पक्षाला जे यश मिळाले ते प्रफुल पटेल यांच्यामुळे मिळाले आणि अपयश हे माझ्यामुळे असेल तर ते मी स्वीकारते, यालाच लीडरशिप म्हणतात.
दिल्लीतील अदृश्य शक्तीने महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडले. त्यामुळे मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालं. महाराष्ट्रात पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला आधी उपमुख्यमंत्री नंतर हाफ मुख्यमंत्री केले. त्यामुळे दिल्लीतले अदृश्य हात महाराष्ट्राचे खच्चीकरण करत असल्याचं दिसून येतेय, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली.


