धक्कादायक घटना : हंसराज अहिर यांच्या पुतण्याची आत्महत्या

धक्कादायक घटना : हंसराज अहिर यांच्या पुतण्याची आत्महत्या
– हत्या की आत्महत्या तर्कवितर्क

प्रतिनिधी
चंद्रपूर : ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा आणि त्याच्या मित्राचा मृतदेह चंदीगढमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही हत्या की आत्महत्या याबबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

काही महिन्यांपूर्वी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे लहान बंधू हितेंद्र अहिर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या दुःखातून सावरत असताना पुन्हा अहिर कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. हंसराज अहिर यांचे मोठे बंधू हरी अहिर यांचा मुलगा महेश अहिर याचा मृतदेह चंदीगढ येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे.

चंदीगढ येथील कजेहडी जंगलात 2 युवकांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत स्थानिक नागरिकांना आढळून आले होते. त्यांनतर स्थानिक परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत चंदिगढ सेक्टर 36 च्या पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला. मृतकांमध्ये महेश अहिर व हरीश धोटे यांचा समावेश होता. हरीश व महेश हे दोघे जिवलग मित्र असल्याची माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी दोघेही कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. याबाबत चंद्रपूर शहर पोलिसात अहिर कुटुंबाने तक्रार सुद्धा नोंदविली होती. मात्र, अचानक अशी घटना घडल्याने अहिर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

दोघांनी चंदिगढ येथे जाऊन आत्महत्या का केली? की दोघांची हत्या झाली याच कारण सध्या अस्पष्ट आहे. दोघे तरुण हे कजेहडी गावातील हॉटेलात थांबले होते. त्याठिकाणी जवळ रेल्वे स्थानक व बस स्थानक आहे. चंद्रपूर पोलिसांची एक टिम मृतदेह ताब्यात घेण्यासाठी चंदीगढला रवाना झाली आहे.