कोण म्हणाले? गोमुत्रधाऱ्यांनो निवडणुका घ्या मग पोपट कोणाचा उडतो

कोण म्हणाले? गोमुत्रधाऱ्यांनो निवडणुका घ्या मग पोपट कोणाचा उडतो
-कार्यकारिणीच्या बैठकीत उडवली खिल्ली

प्रतिनिधी
मुंबई : हिंमत असेल तर तत्काळ महानगरपालिका निवडणुका घ्या. मग पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जे दिसले ती एक झलक होती. गोमुत्रधाऱ्यांनो निवडणुका घ्या मग पोपट कोणाचा उडतो हे कळेल. असा थेट इशारा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या पुणे येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीबाबत खिल्ली उडवली. या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते, त्यांचे फोटोही समोर आले आहेत. असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत 16-16 चा फॉर्म्युला ठरलाय अशा बातम्या मला माध्यमातूनच कळाल्या. मात्र आमचा अजून असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीत मतभेद नाही. आम्ही या घटनाबाह्य सरकारला घालवू. आमचे 19 खासदार होते आणि राहतील. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या असतात त्या बदलू शकत नाही. आमचा आकडा कायम आहे.

गुरुवारी सुषमा‎ अंधारे या बीडमधील सभेच्या मैदानाची व‎ तयारीची पाहणी करत असताना‎ जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व‎ अंधारे यांच्यात वाद झाला. स्वतः‎ जाधव यांनी याबाबत एक‎ व्हिडिओ केला आहे. होय, मी सुषमा‎ अंधारेंच्या दोन‎ कानशिलात‎ लगावल्या, असा आरोप जिल्हाप्रमुखाने केला आहे. यावर संजय राऊत म्हणाले, सुषमा अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. त्यांच्या बाबतीत जो काही प्रकार झाला, तो बेशिस्तपणा पक्षात चालणार नाही. त्या संबंधित जिल्हा प्रमुखाची तत्काळ हकालपट्टी झाली आहे.

प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पुण्यात झाली, या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या कार्यकारिणीच्या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. त्यांचे फोटो सामनात प्रसिद्ध झाले आहेत. कोणी जांभया देत आहे. कोण काय करत आहे. आणि अशा मेलेल्या कार्यकारिणीसमोर आमची खिल्ली उडवत आहेत. फडणवीस झोपलेल्या लोकांसमोर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, घटनाबाह्य सरकारचा पोपट मेलेला आहे. विधानसभा अध्यक्षांविषयी आदर आहे. ते घटनात्मक पदावरील व्यक्ती. जसा आदर राज्यपालांविषयी होता तसा आदर विधानसभा अध्यक्षांविषयी आहे. पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल, कृषी उत्पन्न बाजार समितीत जे दिसले ते झलक आहे ताबडतोब मनपा निवडणुका घ्या मग पोपट कोणाचा उडतो हे कळेल.

संजय राऊत म्हणाले, भाजपचे हिंदुत्व गोमुत्रधारी आहे. गोमुत्राची फॅक्टरी. दंगली घडवणाऱ्या टोळ्या भाजपने तयार केल्या आहे. राज्यात हिंदुत्वाच्या नावावर ते दंगली घडवत आहेत. मुळातच त्र्यंबकेश्वरची घटना भंपक आहे. मात्र मी त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांचे स्वागत त्यांनी या गोष्टीला थारा दिला नाही, गोमुत्रधाऱ्यांना पळवून लावले. तुमच्या कडे किती राज्य. 36 राज्य देशात गुजरात, उत्तरप्रदेश वगळता तुमच्याकडे काय.