कॅप्टन अमरिंदर सिंग होणार महाराष्ट्राचे राज्यपाल
-भाजपाच्या गोटातून हालचाली
प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण याची अद्याप पुष्टी झाली नाही. भाजप नेतेही यावर भाष्य करण्यास तयार नाहीत. पण भाजपने अमरिंदर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल पद देऊन पंजाबमध्ये राजकीय फायदा लाटण्याची जोरदार तयारी केल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वीच आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ते केव्हाही या घटनात्मक पदावरून दूर केले जातील, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. आता अचानक काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले आहे.
–अमरिंदर सिंग पंजाबचे माजी मुख्यमंत्री
कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते पंजाबचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षही होते. त्यांनी 2002 ते 2007 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून पंजाबची धूरा वाहिली होती. त्यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजे होते. त्यांनी 1963 ते 1966 पर्यंत भारतीय लष्करातही योगदान दिले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसर मतदार संघातून विजय मिळवला.
पण काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद व पक्षनेतृत्वाशी झालेल्या बेबनावामुळे अमरिंदर यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) नामक राजकीय पक्ष स्थापन केला. पण नंतर त्यांनी तो भाजपत विलीन केला.
–भाजपला पंजाबमध्ये फायदा
कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. त्यामुळे भाजप त्यांच्या नावाचा राजकीय फायदा उठवण्याच्या प्रयत्नांत आहे. विशेषतः त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करून पंजाबमध्ये आपली मेख हलवून अधिक घट्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळेही अमरिंदर यांना भाजप महत्त्व देत असल्याचा दावा केला जात आहे.


