काय आहे प्रकरण ? डीसीएम, प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आशिया बुक ऑफ रेकॉर्डसची नोंद
– सहा हजारांहून अधिक किलोचा ‘राम हलवा’
प्रतिनिधी
नागपूर : अयोध्येतील भव्य राम श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठापना होत असताना तेथून शेकडो किमी अंतरावरील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरातही हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘जय श्री राम’ चा जयघोष झाला. २५ हजार दीपक उजळवून तसेच ६ हजारांहून अधिक किलोचा ‘राम हलवा’ तयार करून ‘आनंदोत्सवाचा विश्वविक्रम’ करण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी मंदिरात सुरू असलेल्या ‘राम हलवा’ उपक्रमाला भेट दिली. श्री महालक्ष्मी जगंदबा संस्थानचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह फडणवीस यांनी ‘राम हलवा’ तयार करण्यात मदत केली. राम हलवा तयार होत असतानाच अयोध्येत श्री राम प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण सुरू होते. पंतप्रधान मोदी अयोध्येत पूजन करीत असतानाचा कोराडी मंदिर परिसरातही जयघोष निनादत होता. १००० फूट भव्य स्क्रीनवर श्री रामाच्या मूर्तीचे दर्शन होताच संपूर्ण मंदिर परिसरात ‘जय श्री राम’ हा एकच जयघोष निनादला. फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली.
पंतप्रधान मोदी अयोध्येत श्री रामाची आरती करीत असतानाच संस्थानचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांनीही कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या प्रभू श्री रामाच्या मूर्तीचीही पूजा व आरती केली. श्री रामाचा जयघोष परिसरात गुंजत असताना धार्मिक व भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर मंदिर परिसरातील भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर १८०० किलो कढईत तयार करण्यात आलेला ६००० हून अधिक किलोचा ‘राम हलवा’ मिष्ठान्न हा प्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला. हा राम हलवा नागपूर शहरातील काही मंदिरांसह कामठी व कोराडी परिसरातील बहुतांश गावातील मंदिरातून वाटप करण्यासाठी पाठविण्यात आला.
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तसेच श्रीमती विमलादेवी जैन ट्रस्ट व डी.पी. जैन यांच्या सहकार्याने सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी १८०० किलो वजनाच्या हनुमान कढईत ६००० किलो रामहलवा तयार करण्यात आला. सकाळी ६.३० वा. श्री बावनकुले यांनी हनुमान कढईत तूप ओतून ‘रामहलवा’ शिजविणे सुरू केले.
दुपारी रामहलवा तयार झाल्यावर आशिया बुक ऑफ रेकॉर्डस व इंडिया बुक ऑफ रेकॉड्सवर या उपक्रमाची श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीच्या नावाने अधिकृत नोंद घेण्यात आली. विश्वविक्रम केल्याबद्दल मंदिराचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे व शेफ विष्णू मनोहर यांनी दोन्ही संस्थांकडून विश्वविक्रमाचे पदक व प्रमाणपत्र स्वीकारले. दोन्ही संस्थांचे क्युरेटर डॉ. मनोज तत्ववादी यांनी या विक्रमाची नोंद इतर ६ संस्थांनी घेतल्याची माहिती दिली. कोराडी मंदिर परिसरातील श्री राम मंदिरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापूजा केली. देवेंद्र फडणवीस यांनीही राम मंदिराला भेट देत दर्शन घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही कोराडी मंदिरातील राम हलवा उपक्रमाला भेट दिली. सायंकाळी कोराडी मंदिरात २५ हजार दिवे रांगेत लावून जय श्री राम हे नाव लिहिन्यात आले. हे सर्व दीप सायंकाळी उजळण्यात आले त्यामुळे मंदिर परिसारात मनोहारी दृष्य साकारले. ही दीपमाळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविकांनी सायंकाळी कोराडी मंदिरात उपस्थिती लावली.


