काँग्रेसने पुढे यावे: भाजपाला 100 च्या आत रोखता येईल
-नितीशकुमार म्हणतात, विरोधकांची मोट बांधली पाहिजे
प्रतिनिधी
बिहार : देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांविषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोठे विधान केले आहे. ‘भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेसने समोर येऊन विनाविलंब विरोधकांची मोट बांधली पाहिजे. सर्वजण एकजूट झाले तर भाजपला 100 च्या आत रोखता येईल यात कोणताही शंकता नाही,’ असे ते म्हणालेत.
दुसरीकडे, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी नितीश कुमार यांच्या विधानावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ‘नितीशकुमार जो विचार करत आहेत, तोच विचार काँग्रेसच्याही मनात आहे. पण प्रथम आय लव्ह यू कोण म्हणणार हा प्रश्न आहे. मी तुमचा संदेश पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवेल. मी एक वकील असून, तुमच्यातर्फे युक्तिवाद करेल,’ असे ते म्हणालेत.
पाटण्यात आयोजित CPI-ML च्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना सीएम नितीश कुमार म्हणाले की, पंतप्रधान पदाच्या मुद्यावर माझी कोणतीही वैयक्तिक इच्छा नाही. आम्हाला केवळ बदल हवा आहे. सर्वजण ठरवतील ते मला मान्य असेल. पण आता काँग्रेनसे पुढे येऊन निर्णय करावा. विरोधकांना एकजूट करण्यात आला उशीर होता कामा नये.
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आमचे स्वागत केले. 2024 मध्ये सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपचा सफाया होईल. आज स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्वच जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन वाटचाल करावी लागेल.


