मुंबईत राजकारण बदलणार : भाजपाच्या मदतीने होणार ठाकरेंचा महापौर

मुंबईत राजकारण बदलणार : भाजपाच्या मदतीने होणार ठाकरेंचा महापौर

-२२ तारखेच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत, आता तेथील नेतेमंडळींना महापौर आरक्षणाचे वेध लागले आहेत. महापौर कोणाचा होणार यावरून इतर महापालिकांत थोडे थंडे वातावरण असले तरी मुंबई महापालिकेत राजकारण तापलेले आहे.

कनाथ शिंदेंना वाटतेय आपला महापौर असावा, भाजपला वाटतेय आपला असावा. परंतु, तिसराही एक ठाकरे गट आहे ज्यांना पुन्हा आपला महापौर मुंबईच्या तख्तावर बसावा असे वाटत आहे.

तसे स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महायुती आणि ठाकरे आघाडी व काँग्रेस मिळून जर एक झाले तर त्यांची आघाडी अशा दोघांनाही संधी राहणार आहे. यामुळे दोन्ही बाजुंनी प्रयत्न सुरू झाले आहेत.

महापौर कोण असणार, कोणाचा असणार या गोष्टी २२ तारखेच्या आरक्षण सोडतीवर पूर्णपणे अवलंबून आहे. यामुळे याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या सोडतीत अशी एक संधी ठाकरेंची दार ठोठावतेय जी महापौर पद आपसुकच त्यांच्या पदरात पाडण्याची शक्यता आहे.

देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल,” या उद्धव ठाकरेंच्या विधानामागे एक मोठे राजकीय आणि तांत्रिक गणित दडलेले आहे असे यावरून वाटत आहे. परंतू, तरीही या समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मुंबईची जेव्हा नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली तेव्हा, दोन जागा एका समाजासाठी आरक्षित ठेवल्या गेल्या होत्या. या दोन जागाच ठाकरेंचे नशीब पालटू शकणार आहेत. एकूण २२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये एसटी, एससी आणि ओबीसी आदी महिलांना आरक्षण मिळणार आहे.

या सोडतीमध्ये दोन जागा अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तर अनुसूचित जातीसाठी एकूण १५ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता निकालानंतर एसटीसाठी आरक्षित जागांवर ठाकरेंचेच उमेदवार जिंकून आले आहेत. तिथे भाजप, शिंदेंनी देखील आपले उमेदवार दिले होते. परंतू, ठाकरेंच्या शिलेदारांनी महायुती, काँग्रेसला पाणी पाजत विजय मिळविला होता.

ST प्रवर्गातील दोन्ही जागांवर ठाकरे गटाने विजय मिळवल्यामुळे, जर महापौरपद अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव झाले, तर उद्धव ठाकरे यांचा महापौर होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे एसटी महिला आणि एसटी सामान्य असे या दोन्ही जागांवर आरक्षण होते आणि ठाकरेंची एसटी महिला उमेदवारही जिंकली आहे अन् एसटी सामान्यमधून पुरुष उमेदवारही जिंकला आहे.

ठाकरेंना महापौर पदाचे दार ठोठावणारे हे प्रभाग आहेत, प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१. ५३ मधून जितेंद्र वळवी तर १२१ मधून प्रियदर्शनी ठाकरे या जिंकल्या आहेत. २०२३ च्या अधिसूचनेनुसार महापौर पद हे रोटेशनल असणार आहे. यामुळे ते महिला खुला प्रवर्गाकडून आता एससी, एसटी किंवा ओबीसी या प्रवर्गाकडे देखील जाणार आहे. असे झाले तर बहुमत असूनही भाजप आणि शिंदे शिवसेना यांना महापौर बसविता येणार नाही.