या खासदाराच्या अडचणीत मोठी वाढ : झाला गुन्हा दाखल
-सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार काढला
प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील भाजपाचे राज्यसभा खासदार अनंत महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने महाराज यांना दिलेला राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार काढून घेतला. त्यानंतर भाजपा खासदाराने शुक्रवारी दिलगिरी व्यक्त करताना आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफीही मागितली. मात्र, या प्रकरणामुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
अनंत महाराज यांचे खरे नाव नागेंद्र रॉय असून, ते कूचबिहार जिल्ह्यात राजबंशी (अनुसूचित जाती) समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. हा समुदाय पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा महत्त्वाचा मतदारवर्ग मानला जातो. यावर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराज यांना ‘बंगाबिभूषण’ पुरस्कार प्रदान केला होता. राजबंशी समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासातील योगदानाची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी हा पुरस्कार देण्यात आल्याने अनुसूचित जाती समुदायाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा तृणमूलचा हा प्रयत्न मानला गेला. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाने तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव करून बंगालमध्ये एकहाती सत्तास्थापन केली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शुक्रवारी कूचबिहार पोलिसांनी अनंत महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. एका स्थानिक रहिवाशाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी तशी कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. आमदार, खासदार किंवा कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो, कायदा सर्वांसाठी समान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. महाराज यांच्यापाठोपाठ त्यांच्या समर्थकांनीही नेताजींबद्दल समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी कूचबिहार पोलिसांनी त्यांच्या पाच निकटवर्तीयांना शुक्रवारी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १०० हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. दरम्यान, वाद वाढल्यानंतर महाराज यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफीही मागितली आहे.
–अनंत महाराज यांचे काय आहे विधान
कूचबिहारमधील दिनहाटा येथील एका कार्यक्रमातील अनंत महाराज यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळून आला. या भाषणात त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ‘आझाद हिंद फौज’ यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी नेताजींचा उल्लेख ‘युद्ध गुन्हेगार’ असा केला. त्याशिवाय महाराज यांनी आपल्याच पक्षाविरोधात (भाजपा) जाहीर नाराजीही व्यक्त केली. “पश्चिम बंगाल आणि उत्तर बंगालमध्ये मीच भाजपाची पाळेमुळे रोवली आणि त्यामुळेच राज्यात पक्षाचे सरकार स्थापन झाले. आता मात्र माझ्यापेक्षा ‘कुत्र्यांना’ महत्त्व दिले जात आहे. मी एक बोलतो आणि माझ्याबद्दल भलताच प्रचार केला जातो. मी कोणाचे ऐकावे? कोणावर विश्वास ठेवावा? अशा प्रकारे त्यांनी मला संपवले आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. बंगालचे विभाजन करून स्वतंत्र ‘कूचबिहार’ राज्य निर्माण करण्याची जुनी मागणीही महाराज यांनी केली. अनंता महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली. त्यानंतर भाजपा सरकारने त्यांना दिलेला ‘बंगाविभूषण’ पुरस्कार मागे घेतला. या कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी महाराज यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून दिलगिरी व्यक्त केली. नेताजींविषयी अनावधानाने केलेल्या विधानांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून क्षमा मागतो, असे म्हणत त्यांनी निर्माण झालेला रोष शांत करण्याचा प्रयत्न केला.
–कोण आहेत खासदार अनंत महाराज?
अनंत महाराज हे पश्चिम बंगालमधील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. ते ‘ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशन’ या संघटनेतील एका गटाचे नेतृत्व करतात. गेल्या अनेक वर्षांपासून या संघटनेकडून ग्रेटर कूचबिहारला स्वतंत्र राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगालमधील अनुसूचित जातींमध्ये राजबंशी समाज हा सर्वात मोठा गट आहे. राज्यातील सुमारे २.१४ कोटी अनुसूचित जातींच्या लोकसंख्येपैकी १८ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राजबंशी समाजाची आहे. या समाजाची मते लक्षात घेऊनच भाजपाने २०२३ मध्ये अनंत महाराज यांना राज्यसभेवर पाठवले होते. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसकडूनही अनेक वर्षांपासून या समाजाला आकर्षित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला राज्यात मोठे यश मिळाले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अचानक अनंत महाराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी कूचबिहार लोकसभा मतदारसंघात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या या भेटीमुळे महाराज हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, महाराज यांनी भाजपाची साथ सोडली नाही. पक्षावर वेळोवेळी टीका करूनही ते भाजपासोबतच राहिले.
विरोधक म्हणतात, महाराज यांना अटक करा
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार अनंत महाराज यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. दरम्यान, माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी भाजपा सरकारने महाराज यांच्याविरोधात केलेली कारवाई म्हणजे दिखावा असल्याची टीका केली आहे. “बंगाबिभूषण पुरस्काराची कोणाला पर्वा आहे? भाजपाच्या राज्यसभा खासदाराला वाचवण्यासाठी ही केवळ दिखाऊ कारवाई आहे. सरकारला आपली प्रामाणिकता सिद्ध करायची असेल तर यापेक्षा कठोर पावले उचलण्याची गरज आहे,” असे सलीम यांनी म्हटले आहे. दरम्यान, फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस जी. देवराजन यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहून अनंत महाराज यांच्या वक्तव्याची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. अनंता महाराज यांना नेताजी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेना तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अन्य महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्ये करण्यापासून स्पष्टपणे परावृत्त करण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले. या प्रकरणांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.


