भाजपात प्रवेश करताच या खासदाराने गायले संघ परिवाराचे गोडवे
-वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
प्रतिनिधी
नवी दिल्ली : गांधी परिवारापेक्षा संघ परिवार महान असल्याचे विधान राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून त्यावरून काँग्रेसचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेसला रामराम केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच सुष्मिता देव यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पूर्वाश्रमीच्या पक्षांमध्ये झालेला अपेक्षाभंग, नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनावर केंद्र सरकारी भूमिका, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सामाजिक योगदान यांसारख्या विषयांवर स्पष्टपणे आपली मते मांडली.
प्रश्न : तीन राजकीय पक्षांमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला?
सुष्मिता देव : माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’ (NSUI) मधून झाली. काही वर्षे पक्षात सक्रियतेने काम केल्यानंतर २०२१ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसमधून तृणमूलमध्ये जाणे हा काही वैचारिक बदल नव्हता. खुद्द ममता बॅनर्जी यांनीही स्वत: काँग्रेसमधून बाहेर पडून आपल्या पक्षाची स्थापना केली होती. मात्र, त्यानंतर माझ्या लक्षात आले की, बंगाल असो वा देशातील इतर कोणताही भाग तृणमूल काँग्रेसची मतपेढी ही विचारसणीवर आधारित नसून व्यक्तिकेंद्रीत आहे. त्याउलट काँग्रेसचा काही प्रमाणात वैचारिक पाया आहे. भाजपाबाबत मात्र परिस्थिती वेगळी असून त्यांनी आपल्या विचारसरणीशी कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळेच मतदार हे भाजपाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवूनच मतदान करतात.
प्रश्न : विविध पक्षांच्या सर्वोच्च नेतृत्वाबद्दल तुमचे मत काय आहे?
सुष्मिता देव : काँग्रेसमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर आढावा बैठका घेतल्या जातात. त्यामुळे पक्ष लोकशाहीवादी असल्याचे वाटते. पण, निर्णयांच्या अंमलबजावणीच्या वेळी अंतर्गत एकमताचा अभाव जाणवतो. तृणमूल काँग्रेसमध्ये चर्चेसाठी फारशी व्यासपीठेच नाहीत. संपूर्ण अधिकार एका व्यक्तीकडेच आहे. कारण, ममता बॅनर्जी यांनीच पक्षाची उभारणी करून त्याला बळकटी दिली आहे. भाजपाबाबत अनेकजण म्हणतात की, पक्षात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेच निर्णय अंतिम मानले जातात; पण मला ते खरे वाटत नाही. कारण, भाजपात प्रत्येक खासदाराचे मत विचारात घेतले जाते. आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांवरही पक्षश्रेष्ठींकडे मोकळेपणाने चर्चा करता येते. त्याशिवाय पक्षाची संघटनात्मक यंत्रणा आहे. गरज पडल्यास पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांशीही संवाद साधता येतो. हे सर्व निष्फळ ठरले तरी संघ परिवाराची यंत्रणा तळागाळातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असते.
प्रश्न : तुमची संघ परिवारातील वरिष्ठ नेत्यांशी भेट झाली आहे का?
सुष्मिता देव : नाही… पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले अनेक दिग्गज नेते संसदीय व्यवस्थेचा महत्वाचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे इथे संवादासाठी अनेक स्तर उपलब्ध आहेत. काँग्रेसमधील वरिष्ठ स्तरावरील एखादी व्यक्ती तुमच्यावर नाराज झाली, तर तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. गांधी परिवाराविरोधात जाऊन काँग्रेसमध्ये टिकून राहणे कठीण असते; पण भाजपामध्ये गुणवत्ता असेल, तर काम करण्यासाठी नेहमी संधी मिळते.
प्रश्न : काँग्रेसकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सातत्याने टीका केली जाते. भाजपामध्ये संघ परिवाराच्या भूमिकेकडे तुम्ही कसे पाहता?
सुष्मिता देव : काँग्रेसही एका परिवाराच्या नेतृत्वाखाली चालते. एका बाजूला गांधी परिवार आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपाची वैचारिक प्रेरणा असलेला संघ परिवार आहे. एका कुटुंबापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी मोठी संघटना अधिक चांगली आहे. कारण, अशा संस्थेत विविध मतांना स्थान असते. दोन्हीकडे ‘परिवार’ आहे, पण गांधी परिवारापेक्षा संघ परिवार अधिक लोकशाहीवादी आहे. कारण तो एका कुटुंबापुरता मर्यादित नसून मोठी संस्था आहे.
प्रश्न : याच फरकामुळे तुम्ही भाजपामध्ये आलात का?
सुष्मिता देव : काँग्रेसने सातत्याने स्वतःची विचारसरणी कमकुवत केली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर आघाडी केली. तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत अनेक निवडणुका लढवल्यानंतर अचानक जोसेफ विजय यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आसाममध्ये सुरुवातीला जातीयवादी पक्षांशी युती करणार नसल्याचे सांगितले; पण त्यानंतर बदरुद्दीन अजमल यांच्या मुस्लीम संघटनेबरोबर हातमिळवणी केली. आजची काँग्रेस ही माझे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांच्या काळातील काँग्रेस राहिलेली नाही.


