केंद्राचा नियम नकोय : दक्षिणेत कार्यक्रमापूर्वी वाजविले जाईल राज्यगीत

केंद्राचा नियम नकोय : दक्षिणेत कार्यक्रमापूर्वी वाजविले जाईल राज्यगीत

-आता राष्ट्रीयगीत गायले जाईल ३ मिनिटे १० सेकंद

प्रतिनिधी
केरळ : केंद्र सरकारने २८ जानेवारी २०२६ रोजी ‘वंदे मातरम्’च्या गायनाबाबत नवा प्रोटोकॉल जारी केला. त्यानुसार, राष्ट्रीय गीताची अधिकृत सहा कडव्यांची पूर्ण आवृत्ती गायली किंवा वाजवली जाईल. या आवृत्तीचा कालावधी सुमारे ३ मिनिटे १० सेकंद आहे. एखाद्या शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीत दोन्ही असतील, तर आधी ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जन गण मन’ सादर केले जावे. राष्ट्रपतींचे औपचारिक स्वागत, ध्वजारोहण आणि राज्यपाल किंवा नायब राज्यपालांच्या काही औपचारिक कार्यक्रमांमध्येही राष्ट्रीय गीताची अधिकृत आवृत्ती गायली जावी, अशी तरतूद कऱण्यात आली.

पण, या आदेशाला दक्षिणेतील राज्यांतून आव्हान दिले जात आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी शासकीय कार्यक्रमांत राज्यगीत आधी गायले जाणार, असा ठराव संमत केला आहे; तर केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या सरकारने आधी ‘वंदे मातरम्’ची सर्व कडवी गायली जाणार असा निर्णय जारी केला. पण, पक्षांतर्गत तसेच विरोधकांकडून वाढता विरोध पाहता केरळचे आरोग्य मंत्री के मुरलीधरन यांनी वेगळे विधान केले. केरळमध्ये राष्ट्रीय गीताची फक्त दोन कडवी गायली जाणार, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जानेवारीतील राष्ट्रीय गीताच्या संदर्भातील निर्णयाचे पालन करावे लागेल, असे निर्देश दिले होते. या आदेशाला दक्षिणेतील राज्यांनी मात्र आव्हान दिल्याचे दिसत आहे, त्यामुळे पुन्हा केंद्र विरोधात दक्षिणी राज्य असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

तमिळनाडू विधानसभेचा ठराव काय?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी १० ऑगस्टला राज्याच्या विधानसभेत एक ठराव मांडला. या ठरावानुसार, शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला ‘तमिळ थाई वाझ्थू’ हे तमिळ मातेला समर्पित राज्यगीत गायले जाईल. १९७० पासून सुरू असलेली ही पद्धत कायम ठेवण्याची भूमिका या ठरावातून मांडण्यात आली आहे.

विधानसभेत बोलताना विजय यांनी नमूद केले, “तमिळ ही आमची जीवनवाहिनी आणि भावना आहे,” तमिळ भाषेकडे दुर्लक्ष करून किंवा तिचा अभिमान बाजूला ठेवून राज्याला पुढे जाता येणार नाही. “मातृभाषा ही मातृत्वाइतकीच पवित्र आहे,” अशी भूमिकाही त्यांनी मांडली. तर, विजय यांनी तमिळ ही केवळ भाषा नसून आमच्यासाठी “संस्कृती, विचार आणि प्रेम” असल्याचेही म्हटले आहे.

केरळ सरकारचा निर्णय काय?
स्वातंत्र्यदिनाच्या काहीच दिवस आधी केरळ सरकारने ‘वंदे मातरम्’च्या गायनाबाबत शासन निर्णय जारी केला. केरळचे मुख्य सचिव भिश्वनाथ सिन्हा यांनी ६ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात स्वातंत्र्यदिनाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ “पूर्ण स्वरूपात” गायले जावे असे निर्देश दिले.

मुख्य सचिवांनी जारी केलेला आदेश केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित होता. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान देशभर होणाऱ्या या अभियानातील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रध्वज फडकावताना किंवा प्रदर्शित करताना सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’ गायले जावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते.