अमरावतीत रवी राणाच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फोडणी
-काय म्हणाले राणा?
प्रतिनिधी
अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी ‘तिवसा मतदारसंघात बदल निश्चित असून तो मीच करणार आहे’, असे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे तिवसाचे आमदार राजेश वानखडे हे चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या सोबतीला आता आमदार प्रवीण पोटे हे देखील धावून आले आहेत. राणा-पोटे यांच्यातील कटुता जगजाहीर असताना आता राणांनी राजेश वानखडेंनाच थेट आव्हान दिले आहे. रवी राणांच्या भाजपमधील वाढत्या हस्तक्षेपामुळे आता नवा संघर्ष उफाळून आला आहे.
पक्षातील खांदेपालटामुळे अस्वस्थता
राजेश वानखडे आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष हा प्रथमच चर्चेत आला आहे. यासाठी अलीकडच्या काळातील काही घटना कारणीभूत मानल्या जात आहेत. प्रवीण पोटे यांची विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षात आपले स्थान पुन्हा एकदा भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू केला. गेल्या महिन्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या जागी आमदार प्रताप अडसड यांची तर भाजपच्या शहराध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे यांच्या जागेवर नितीन गुडधे यांची नियुक्ती करण्यात आली. वर्षभरात झालेल्या या खांदेपालटामुळे राणा यांचा गट अस्वस्थ झाला. वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी झाल्या. अखेरीस नितीन गुडधे यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारे पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना काढावे लागले. जिल्हाध्यक्षपदाचा बदल मात्र कायम ठेवण्यात आला. पण, या दरम्यान भाजपमधील राणा विरोधी गटांची एकजूट सुरू झाली.
रवी राणांच्या वक्तव्याचे पडसाद
नाराज असलेल्या रविराज देशमुख यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना आमदार रवी राणांनी रविराज देशमुखांचे तिकीट आपणच कापले होते. पण, आता निश्चित बदल होईल आणि तो मीच करणार, असा दावा केला. त्याचे तीव्र पडसाद भाजपमधील राणा विरोधी गटात उमटले. तडकाफडकी पत्रकार परिषद घेत रवी राणांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. भाजपच्या भरवशावरच रवी राणांचा पक्ष जिवंत आहे. त्यांनी आमच्या लुडबूड करू नये, असा इशारा राजेश वानखडेंनी दिला, तर आपण नवनीत राणा यांना नेता मानत नाही, असे खडेबोल आमदार प्रवीण पोटेंनी सुनावले. आमदार प्रताप अडसड, प्रा. दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, चेतन पवार, जयंत डेहनकर, चेतन गावंडे यांनीही राणांविरोधात दंड थोपटले आहेत. रवी राणा पक्ष चालवतात, कुणाचेही तिकीट कापू शकतात, हा संभ्रम भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ नये, म्हणून ही एकजूट असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.


