मुख्यमंत्र्यांचे मोठे भाष्य : पुण्यावर प्रेम पण निवडणूक लढणार…?
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात मुलाखत
प्रतिनिधी
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या प्रचाराच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका-टिप्पणी सुरू असल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला. ‘पुण्यावर फक्त प्रेम ठेवायचं, पण निवडणूक नागपूरमधूनच लढवायची’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अनेक नेत्यांच्या भाषणातून असं समोर येतं की तुमचं (देवेंद्र फडणवीस यांचं) पुण्याकडे खास लक्ष आहे. आम्ही असं ऐकलं की तुम्ही पुण्यातून निवडणूक लढणार? म्हणून तुमचं पुण्याकडे खास लक्ष आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या ठिकाणी मुरलीधर मोहोळ बसलेत, दादा (चंद्रकांत पाटील) या ठिकाणी बसलेत. आमचं चांगलं चालंलय, नागपूरकरांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. सहा-सहा वेळा त्यांनी मला निवडून दिलं आहे. त्यामुळे पुण्यावर फक्त प्रेम ठेवायचं, पण निवडणूक नागपूरमधूनच लढवायची आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
आमच्या मित्राच्या इगोमुळे मुंबईतल्या मेट्रोचं काम…”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात मुलाखत पार पडली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा विकास, पुण्याची मेट्रो, पुण्याचे रस्ते यासारख्या अनेक विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या मुलाखतीत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मित्र म्हणून उल्लेख केला. मित्र म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर टोलेबाजी केली.
“मुंबईत मेट्रो करताना लोकांना काही प्रॉब्लेम नव्हता. आमचे मित्र उद्धव ठाकरे यांनाच अडचण होती. आरे कॉलनीत झाडं कापण्यास त्यांचा विरोध होता. आम्ही त्यांना समजावलं त्यांनी ऐकलं नाही. आम्ही कोर्टात गेलो. काम सुरू झालं. पण तेवढ्यात सरकार गेलं. ठाकरे आले त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली”, असं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.
“आरेच्या कामाबाबत समितीचा रिपोर्ट आला की ही आरेची जागा रिझर्व्ह फॉरेस्टची जागा नाही. इथे इमारती बांधल्या आहेत. पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही. आम्ही परत कोर्टात गेलो. कोर्टाने त्याला मान्यता दिली. पुन्हा सरकार आल्यावर सुप्रीम कोर्टाच्या आधारावर स्थगिती हटवली. जी अंडरग्राऊंड मेट्रो साडे तीन वर्षात केली ती तीन वर्षाने पुढे गेली. त्यामुळेच निर्मिती खर्च १० हजार कोटींची झाली. आम्ही दहापट झाडेही लावली. त्याचा रिपोर्टही दिला. ती झाडे मोठी झाली. त्याचे फोटो दिले. पण केवळ इगोसाठी त्यांनी हे केलं”, आसा आरोप फडणीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. “इतर मेट्रोसाठी त्रास झाला नाही. कारण आम्ही वॉर रूम तयार केली होती. सर्व ऑथोरिटींना एकत्र बसवायचो आणि त्यांच्याकडून परवानगी घ्यायचो”, असेही फडणवीस यांनी सांगितलं.


