पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाला शिंदेच्या शिवसेनेचा विरोध

पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाला शिंदेच्या शिवसेनेचा विरोध

-२०२७ मढील सिंहस्थ कुंभमेळासाठी वृक्षतोडीचा विरोध

प्रतिनिधी
नाशिक : गोदावरी नदीकाठी वसलेल्या नाशिक शहरात २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केले जाणार आहे. त्याकरिता परिसरातील १,८२५ झाडांचे तोडकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला पर्यावरण प्रेमींसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनेही या वादात उडी घेतली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने नाशिकमधील आंदोलनात उतरून वृक्षतोडींच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे महायुती सरकारमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे अगदी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या भाविकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही वृक्षतोड योग्य असल्याचे म्हटले होते. विरोधकांकडून घेतल्या जात असलेल्या आक्षेपांवरही त्यांनी सडेतोड उत्तर दिले होते. तपोवनातील ही जागाही मिळाली नाही, तर सिंहस्थ होणार कसे, वृक्षतोड न करता साधुग्राम उभारायचे कुठे, असे प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणप्रेमींसह आंदोलनकर्त्यांना खडेबोल सुनावले होते.

वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारची कोंडी
नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पर्यावरणवादी, स्थानिक नागरिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनीदेखील सरकारच्या या निर्णयास विरोध करीत आपले मत मांडले आहे. ३५ एकरांवर पसरलेल्या या जागेचा उपयोग देशभरातून येणाऱ्या साधूंसाठी घरे/आखाडे बांधण्यासाठी होणार आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत, जर पर्यावरण वाचले, तरच पुढची पिढी वाचेल, असे विधान केले होते.

शिंदे गटाची भूमिका

नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर वाढलेल्या वृक्षतोडीच्या असंतोषामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनीही राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत मतभेद आणखी प्रकर्षाने पुढे येताना दिसत आहेत. शुक्रवारी तपोवन परिसरात शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने एकत्र आले. यावेळी त्यांनी हातात वृक्ष तोडीला विरोध दर्शविणारे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. ‘वृक्षतोड थांबवा अन्यथा तीव्र परिणाम भोगा’ असा इशारादेखील शिंदेंच्या सेनेकडून देण्यात आला, तर संतप्त कार्यकर्त्यांनी थेट करवत आणि कुऱ्हाड जाळून आपला संताप यावेळी व्यक्त केला. शिंदे गटाने घेतलेली ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधी असल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.

शिंदे गटाचे नेते म्हणतात…

वृक्षतोडीचा हा मुद्दा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा आहे. त्यामुळे कोणीही या विषयात राजकारण आणू नये. जर ही झाडेच राहिली नाहीत तर काय होईल. साधुसंतांना कुंभमेळा साजरा करण्यासाठी झाडेच लागतात. वृक्षतोडीचा हा मुद्दा आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकणार आहोत. सध्या प्रशासनाने घेतलेली भूमिका आम्हाला संशयास्पद वाटत असल्याचा आहे, असे शिंदे सेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी म्हटले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी वृक्षांना ओवळून त्यांना राख्यादेखील बांधल्या. ही झाडे आमचे भाऊ असून त्यांच्यावर कुठलीही कुऱ्हाड चालू देणार नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी घेतली.

वृक्षतोडीवरून विरोधक आक्रमक

तपोवनाची वृक्षतोडीविरोधात आधीच शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीदेखील सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. महायुती सरकारने वृक्षतोडीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विरोधकांकडून देण्यात आला आहे. त्यांना पर्यावरण प्रेमींसह स्थानिक रहिवासी आणि कलाकारांनी साथ देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे आधीच महायुती सरकारसमोर पेच निर्माण झाला असतानाच आता शिंदेंच्या सेनेच्या भूमिकेमुळेही सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.