आता राज्यात या निवडणुकाना स्थगिती : हे ठरले प्रमुख कारण
-मात्र, गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुका होणार
प्रतिनिधी
बुलढाणा : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत अपवाद वगळता सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने याविषयीचे आदेश आज शुक्रवारी जारी केले आहे. यामुळे सहकार क्षेत्रातील रणसंग्रामाला तूर्तास विराम मिळाला आहे. मात्र, या आदेशातून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका व अन्य काही कार्यवाहींना सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थाच्या निवडणुका वेळेतच होणार आहेत.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने यापूर्वी घेतला होता. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठे थैमान घातले होते. अतिवृष्टीमुळे आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील २० हून अधिक जिल्हे प्रभावित झाले होते. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था, समितीची निवडणूक, नियम २०१४ मधील नियम ४ अंतर्गत अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मागील ३० सप्टेंबर २०२५ रोजीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते, त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका वगळून आदेश देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची धामधूम व गोंधळ सुरु आहे. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा एक टप्पा पूर्ण झाला असून आता २० डिसेंबर रोजी दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. यापाठोपाठ महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका कधी होतील याविषयी राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. तोच दाखला देत सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आली आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी निवड करणे. सभापती, उप सभापती व अन्य पदाधिकारी यांनी पदाचा राजीनामा देणे अथवा मृत्यू अनर्हता या कारणांमुळे रिक्त झालेले पदाधिकारी यांची निवड करणे. राजीनामा, मृत्यु, अनर्हता या कारणांमुळे संचालक मंडळातील नैमित्तीकरित्या रिक्त झालेल्या जागेवर अन्य संचालकाची निवड करणे. ‘क’ व ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया. मतदार यादी प्रसिद्धीचा टप्पा सुरू असलेल्या संस्था, अशा संस्थांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत कार्यवाही चालू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


