काय बोलता ? मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी विरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

काय बोलता ? मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी विरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

-विरोधकांनी केली कारवाईची मागणी

प्रतिनिधी
बुलढाणा : भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विद्याधर महाले यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार उदयनगरचे माजी सरपंच मनोज लाहुडकर आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

विद्याधर महाले सरकारी सेवेत असून त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारीही म्हणून करण्यात आली आहे. सरकारी सेवेत असतानांनाही त्यांनी आचारसंहिता काळात भाजपचा प्रचार केला. हा आचारसंहितेचा भंग, असे या तक्रारीत नमुद आहे. काही दिवसांपूर्वी चिखलीमधील भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमातही विद्याधर महल्ले राजकीय मंचावर होते. राजकीय कार्यक्रमाच्या पोस्टरवरही त्यांचे छायाचित्र होते. तेथून थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे राहुल बोंद्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप करता येत नाही.

सरकारी कर्मचारी हे जनतेची सेवा करण्यासाठी असतात, कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी नाहीत. अशा प्रकारे पदाचा, सरकारी कार्यालयाचा व अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि लोकशाही मूल्यांवरील आक्रमण आहे,महाले सरकारी सेवेत जबाबदारीच्या पदावर असून त्यांच्याकडून या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप अनुचित आहे, याकडे राहुल बोंद्रे यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले.

याशिवाय चिखली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले काँग्रेसचे काशिनाथ बोंद्रे यांनीही अशाच प्रकारची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी काय अहवाल देतात आणि त्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.