बिहार निवडणुकीत असे असेल चित्र : नितेश, तेजस्वी की प्रशांत किशोर?
-६, ११ नोव्हेंबरला मतदान
प्रतिनिधी
बिहार : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिहार निवडणुकीची घोषणा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत, मात्र बिहारच्या राजकारणातील तीन नेत्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीतील त्यांची कामगिरी त्यांच्या पक्षांचे भवितव्य ठरवेल आणि बिहारच्या राजकीय इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाईल असे, बोलले जात आहे.
जनता दल (युनायटेड) (जेडीयू) चे नेते नितीश कुमार गेली दोन दशके बिहारचे मुख्यमंत्री आहेत. एकेकाळी ‘सुशासन बाबू’ म्हणून विकासकामांसाठी त्यांची प्रशंसा होत असे, पण गेल्या काही वर्षांत ते त्यांच्या प्रशासकीय कामांपेक्षा त्यांच्या राजकीय निर्णयांसाठी जास्त चर्चेत राहिले आहेत. नितीश कुमार यांच्या प्रकृतीबद्दल अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे, जर जेडीयू-भाजपा युतीने निवडणूक जिंकली तर ते मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळू शकतील का, अशी शंका अनेकजण उपस्थित करत आहेत. भाजपाने आतापर्यंत दुसरा पर्याय समोर न ठेवल्यामुळे, नितीश कुमारच युतीचे नेतृत्व करत आहेत. प्रश्न असा आहे की, या निवडणुकीनंतर नितीश कुमार १० व्या वेळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील की नाही?
तेजस्वी यादवांसमोरील आव्हान
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) संस्थापक आणि ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव या निवडणुकीत एका मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहे. २०२० च्या निवडणुकीत, आरजेडीने लढवलेल्या १४४ जागांपैकी ७५ जागा जिंकल्या होत्या आणि ते विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आले होते. मात्र, आरजेडीचा सहयोगी पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे त्यांना सरकार स्थापन करता आले नाही.


