हे ठरले कारण : या आमदाराचा भाजपाच्या सर्व पदाचा राजीनामा
-धार्मिक वक्तव्य करून चर्चेतील आमदार
प्रतिनिधी
तेलंगणा : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपामध्ये सध्या संघटनात्मक निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पक्षाने आतापर्यंत अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. सोमवारी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमधील नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यातील तेलंगणामधील प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवर भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेप घेतला. इतकंच नाही तर त्यांनी नाराज होऊन भाजपाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. सध्या भाजपाकडून टी राजा यांच्या राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. सध्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांची मनधरणी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार टी राजा सिंह इच्छुक होते. यासाठी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली होती. मात्र, पक्षाने त्यांच्याकडे कानाडोळा केल्यानंतर टी राजा यांनी थेट भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी भाजपामधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दोन पत्रे शेअर केली. “लोकांचा शांत असण्याचा अर्थ संमती म्हणून घेऊ नये. मी फक्त माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलत आहे, जे माझ्याबरोबर विश्वासाने उभे राहिले आणि आज निराश झाले आहेत,” असं टी राजा यांनी सिंह पोस्टमध्ये म्हटलं.
कोण आहेत आमदार टी. राजा सिंह?
आमदार टी. राजा हे तेलंगणातील भाजपाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरत त्यांनी अनेकदा प्रक्षोभक विधाने केलेली आहेत. तेलंगणाच्या गोशामहल विधानसभा मतदारसंघातून ते दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. राजकारणात येण्याआधी टी राजा हे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात तेलुगु देसम पक्षातून केली होती. २००९ मध्ये टी राजा तेलगु देसमच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले.


