हा नेता म्हणतो, धनंजय मुंडेनाही लवकरच मंत्रिपद

हा नेता म्हणतो, धनंजय मुंडेनाही लवकरच मंत्रिपद

-राजीनाम्यानंतर ओबीसीत पोकळी निर्माण झाल्याचा आरोप

प्रतिनिधी
मुंबई : जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला. भुजबळांसारखा मातब्बर नेता मंत्रिमंडळात दाखल झाल्यानं महायुती सरकारची ताकद वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप झाल्यानंतर अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनामुळे ही पोकळी भरून निघेल अशी शक्यता आहे. यादरम्यान, धनंजय मुंडे हेदेखील काही दिवसांतच मंत्रिमंडळात दिसतील, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांनी मंगळवारी (तारीख २० मे) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होतं. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. हेच खातं छगन भुजबळ यांना मिळणार, असा अंदाज बांधला जात आहे. त्यावर बोलताना “मला वाटतं कोणी कोणाला रिप्लेस करू नये. अशी रिप्लेसमेंट असेल तर त्यांना ओबीसींचा विश्वास कधीही मिळणार नाही. भुजबळांचं स्वतःचं कर्तृत्व आहे. स्वतःची ओबीसीची ठाम भूमिका आहे. धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून भुजबळांना दिलं असेल तर ते ओबीसींना आवडणार नाही. मुंडे काही दिवसात राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील, हे मी महाराष्ट्राला जबाबदारीने सांगतो,” असं हाके यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार”
लक्ष्मण हाके यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या कॅबिनेटमधील समावेशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच जी माणसं ओबीसींच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतील, त्या सर्वांचे आम्ही स्वागत करू आणि जे या धोरणाच्या आड येतील त्यांना आम्ही कडाडून विरोध करू… मग ती कोणत्याही पक्षाची असो… आमचे प्राधान्य फक्त ओबीसींना आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.