दादांना व्हायचं मुख्यमंत्री : ते माध्यमासमोर स्पष्टचं बोलले
-शब्द मागे घेण्याची आली नामुष्की
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा खंत व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद पुन्हा एकदा उमटू लागले असून आता त्यांना मी माझे शब्द मागे घेतो, असं स्पष्टीकरणच द्यावं लागलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
“मलाही मुख्यमंत्री बनायचं आहे, पण योग जुळून येत नाही”, असं अजित पवारांनी एका कार्यक्रमात मिश्किलीत म्हटलं होतं. पण त्यांनी त्यांची ही खदखदच त्यांच्या वक्तव्यातून बाहेर काढली. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी अपेक्षाही पुन्हा बोलून दाखवली. याआधीही अजित पवारांनी अशी खंत बोलून दाखवली होती. पण यावेळी त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागले.
मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “मी गंमतीत म्हटलं होतं. मी तसं म्हटलं असेल तर माझे शब्द मागे घेतो. आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी १४५ पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे. त्याआधी एकनाथ शिंदेंना होतं, त्याआधी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाठबळ होतं.”.


