दिला प्रस्ताव : एकनाथ शिंदे व अजितदादाना मुख्यमंत्रीपद!
-आळीपाळीने मुख्यमंत्री बनण्याची संधी देऊ
प्रतिनिधी
मुंबई / नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या आघाडीशी हातमिळवणी केल्यास दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री बनण्याची संधी देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. महायुतीमध्ये उभय नेत्यांची घुसमट होत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले, “महायुती आणि फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्थिती काही ठिक नाही. त्यांची तिथे घुसमट होत आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो. दोघांनाही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. आम्ही त्यांना आळीपाळीने मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ. भाजपा या दोन नेत्यांना कधीही मुख्यमंत्री होऊ देणार नाही.” धुलिवंदनाच्या दिवशी नाना पटोले यांनी हे भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे विधान केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुख्यमंत्री फडणवीस घेत असलेल्या निर्णयांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने घेतलेले निर्णय आणि प्रस्तावित प्रकल्पांना स्थगिती दिल्याची चर्चा आहे. तसेच नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या निवडीवरूनही महायुतीत वाद असल्यामुळे शिंदे नाराज असल्याचे सांगितले जाते.


