‘हलके में मत लो’, शरद पवारांसमोर का म्हणाले उद्धव ठाकरे
-महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक
प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 232 उमेदवार विजयी झाले. मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला. या निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये विशेष: भाजप आणि शिवसेनेत येताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून, आतापर्यंत राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, सध्या शिवसेनेच्या ‘ऑपरेश टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे, यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत मला माहिती नाही, पण माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सर्व खासदारांची बैठक होती. आम्ही दोन तीन तास चर्चा केली. त्यात कुणाच्याही मनात फुटण्याचा विचार नाही. उद्धव ठाकरेंचे लोक त्यांच्यासोबत एका विचाराने आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान ‘हलके में मत लो’ असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘हलके में मत लेलो हे काय प्रकरण आहे. मला मराठी जेवढं कळतंय त्यात हा शब्द नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे.


